चांगभलं प्रतिनिधी | कराड
सातारा जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार चांगदेव आगवणे यांचे निधन झाले. ते 'आगवणे दादा' या नावाने कराड परिसरात परिचित होते. त्यांचे मूळ गाव चितळी तालुका खटाव असून काही वर्षांपूर्वी ते सातारा पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. सातारा पोलिस दलात सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा अशा विविध ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. विशेषतः कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावला होता. साधे सरळ पण परखड बोलणे हे त्यांचे एक स्वभाव वैशिष्ट्य होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेत काम करताना आगवणे दादांचे सर्व दूर पसरलेले 'खबऱ्यांचे जाळे' आणि गुन्हेगारांची 'मोडस आॅप्रेंटिटी' अनेकदा या शाखेच्या कामी आली. त्यातून त्या-त्या वेळी कराड परिसरातील अनेक शातिर गुन्हेगार जेरबंद झाले होते. त्या काळात कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचा जनमानसात आणि गुन्हेगारी वर्तुळात वचक आणि दबदबा कायम ठेवण्यात ज्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान राहिले, त्यामध्ये आगवणे दादांचा मोलाचा वाटा राहिला.
कराड परिसरातील पारध्यांचा सहभाग असणाऱ्या अनेक चोऱ्या आगवणे दादांच्या चतुराईमुळे गुन्हे प्रकटीकरण शाखेला उघडकीस आणता आल्या. गुन्हेगारांना धाकात ठेवण्याबरोबरच त्यांना सुधारण्याची संधी देण्याचे काम खाकीला करावे लागते, हे प्रत्यक्ष कृतीतून आगवणे दादांनी दाखवून दिले होते. अनेक गुन्हेगारांना त्यांनी प्रबोधन करून गुन्हेगारी पासून परावर्त करण्याचा प्रयत्न केला. ते आध्यात्मिक वृत्तीचे होते. सेवानिवृत्तीनंतर ते चितळी तालुका खटाव या त्यांच्या गावी राहत होते. शेती आणि पशुपालन ही त्यांची आवड ते जपत होते. त्यांच्या निधनाने सातारा पोलीस दलाचा एक सेवानिवृत्त कर्तव्यतत्पर, प्रामाणिक, परखड आणि कष्टाळू जवान काळाच्या पडद्याआड गेला असून समाजानेही एक कर्तव्यनिष्ठ, देशप्रेमी नागरिक गमावला आहे. आगवणे दादांना चांगभलं न्यूज मिडीयाकडून भावपूर्ण श्रद्धांजली !
➖➖➖➖➖➖➖
#चांगभलं #आगवणेदादा #चांगदेवआगावणे #कराड #सातारापोलीस #पोलीसदल #कराडपोलीस #श्रद्धांजली #भावपूर्णश्रद्धांजली #पोलीस #खाकी #कर्तव्यनिष्ठ #पोलीसजवान #सातारा #Karad #Satara #Police #Tribute #ChangbhalaNews

0 टिप्पण्या