कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात एका वकिलाला आणि त्यांच्या मित्राला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अमानुष मारहाण झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद कराडमध्ये उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ कराड बार असोसिएशनने आज शुक्रवारी (दि. १७) न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा आणि कडकडीत 'बंद' पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. तोसिफ खलील शेख आणि त्यांचे मित्र मतीन सय्यद हे १४ एप्रिल रोजी सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे परिसरात गेले होते. यावेळी सुरू असलेल्या कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याच्या कारणावरून तेथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. "तुला व्हिडिओ काढण्याचा अधिकार कोणी दिला?" असे म्हणत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत ॲड. शेख यांचे मित्र मतीन सय्यद हे गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले.
कराड बार असोसिएशनचा आक्रमक पवित्रा
या घटनेची माहिती मिळताच कराड बार असोसिएशनची तातडीची सभा अध्यक्ष ॲड. दीपक थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत पोलिसांच्या या गुंडगिरीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. कायद्याचे रक्षकच जर कायद्याचे पालन करणाऱ्या वकिलांवर हात उचलत असतील, तर सामान्य जनतेचे काय? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
यावेळी संबंधित दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे, सांगोला येथे १५ दिवसांपूर्वी वकिलांवर झालेल्या हल्ल्यातील दोषी पोलिसांवरही कारवाई व्हावी.
मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.
कराड बार असोसिएशनने यासंदर्भातील निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्यमंत्री, गृह मंत्रालय आणि पोलीस महासंचालकांना पाठवले आहे. जर या प्रकरणात त्वरित ठोस कारवाई झाली नाही, तर कोल्हापूर सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वकील संघटना तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे आज कराड न्यायालयातील सर्व कामकाज ठप्प होते, ज्यामुळे पक्षकारांची मोठी गैरसोय झाली. मात्र, वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांविरुद्ध एकजूट दाखवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#KaradNews #ChangbhalaNews #Karad

0 टिप्पण्या