सातारा| चांगभलं वृत्तसेवा
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली झाल्यानंतर, त्यांच्या जागी पुणे येथून बदली होऊन आलेले नवे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतानाच गुन्हेगारांना थेट इशारा दिला. अवैध व्यवसाय करून गुन्हेगारी वाढवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार असून, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने नुकत्याच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, माजी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी पुणे येथील उपायुक्त पदावर कार्यरत असलेले निखिल पिंगळे यांची सातारा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे शहरात कार्यरत असताना निखिल पिंगळे यांनी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवत अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली होती. अनेक गुन्हेगारांना जेलमध्ये धाडून त्यांनी गुन्हेगारीवर वचक बसवला होता. त्यामुळे त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीची छाप साताऱ्यातही दिसणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्यभार स्वीकारल्यानंतर बोलताना पिंगळे म्हणाले की, “गुन्हेगारी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये गुन्हेगारीचे स्वरूप वेगवेगळे आहे. एमआयडीसी परिसर, जास्त लोकसंख्या असलेले भाग आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये गुन्ह्यांचे पॅटर्न वेगवेगळे आहेत. त्या अनुषंगाने नियोजनबद्ध कारवाई केली जाईल.”
तसेच, पोलीस यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन संघटित पद्धतीने काम करून घेतले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. “कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला.
नव्या पोलीस अधीक्षकांच्या या भूमिकेमुळे सातारा जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि वाढती गुन्हेगारी यावर लगाम बसण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#SataraPolice #NikhilPingale #IPSOfficer #SataraNews #CrimeControl #BreakingNews #MaharashtraPolice #LawAndOrder #ChangbhalaNews #SataraUpdate

0 टिप्पण्या