हैबत आडके, कराड | चांगभलं वृत्तसेवा
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी हळूहळू रंगू लागली असून, यावेळी लढतीपेक्षा आघाड्यांतील अंतर्गत संघर्षच अधिक चर्चेत आला आहे. महायुतीत उमेदवारीवरून तणाव वाढताना दिसत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडी अजूनही ठोस निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
महायुतीत ‘इन-हाऊस’ संघर्ष तीव्र...
पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेला हा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. १९९० ते २००२ दरम्यान भाजपने येथे सलग वर्चस्व राखले होते. २००८ मध्येही चंद्रकांतदादा पाटील यांच्या विजयाने भाजपने हा गड कायम ठेवला.
मात्र २०२० मध्ये समीकरणे बदलली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी १,२२,१४५ मते मिळवत पहिल्याच फेरीत विजय मिळवला. भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३,३२१ मते मिळाली आणि ४८,८२४ मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
यावेळी परिस्थिती पुन्हा पालटताना दिसत आहे. अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली असून, त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे.
मात्र दुसरीकडे माहिती मधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ही जागा सहजासहजी सोडण्याच्या तयारीत दिसत नाही. त्यांचा या जागेवर महायुतीचा घटक पक्ष म्हणून प्रबळ दावा असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून काही इच्छुक पुढे येत असल्याचे समजते.
महाविकास आघाडीत अजूनही ‘वेट अँड वॉच'...
२०२० मध्ये शिवसेना (एकत्रित), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत अरुण लाड यांना विजय मिळवून दिला होता.
मात्र सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट (शरद पवार व अजित पवार), शिवसेनेतील फूट (उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे) , या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एकसंध ताकद कमी झाल्याचे दिसत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांकडून अद्याप ठोस उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने किंवा तशी चाचपणीही सुरू झालेली दिसत नसल्याने या मतदारसंघात आघाडी अजूनही संभ्रमात असल्याचेच समोर आले आहे.
मागील २०२० च्या निवडणुकीत काय घडलं !
एकूण मतदार : ४,२६,२५७,
झालेले मतदान : २,४७,०५० (सुमारे ५८%),
अवैध मते : २,१२८,
विजयासाठी आवश्यक कोटा : १,१४,१३० / १,१४,१३१,
अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस) – १,२२,१४५ मते (पहिल्याच फेरीत विजय),
संग्राम देशमुख (भाजप) – ७३,३२१ मते,
रूपाली पाटील-ठोंबरे (मनसे) – ६,७१३ मते,
एकूण ६२ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत दोन प्रमुख पक्षांतच झाली होती.
पुणे केंद्रस्थानी, साताऱ्यातील स्थिती कशी राहिली...
पुणे शहर हा या मतदारसंघाचा मुख्य केंद्रबिंदू राहिला. डिजिटल प्रचार, बैठका आणि संघटनात्मक ताकद यामुळे पुण्यातच खरी लढत रंगली.
दुसरीकडे सातारा जिल्ह्यात सुमारे ५४,८३५ ते ५९,००० पदवीधर मतदार आहेत. येथे भाजपकडून जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचाराची सूत्रे हातात घेतली होती, तर महाविकास आघाडीने संयुक्त ताकद लावली होती.
जिल्ह्यांमध्ये तुलनेने शांत प्रचार झाला असला, तरी निर्णायक आकडे पुण्यातूनच ठरले.
यंदाची निवडणूक का ठरणार ‘हाय व्होल्टेज’?....
🔹महायुतीतच उमेदवारीवरून संघर्ष.
🔹भाजपकडून गड परत मिळवण्याची आक्रमक तयारी.
🔹शरद लाड यांच्या प्रवेशामुळे बदललेली समीकरणे.
🔹महाविकास आघाडीतील अस्थिरता.
🔹पदवीधर मतदारांचा बदलता कल.
या सर्व घटकांमुळे पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यावेळी केवळ पारंपरिक लढत न राहता यावेळी राजकीय समीकरणांची मोठी चाचणी ठरणार आहे.
गड ; भाजपला ताब्यात घेण्याचे तर राष्ट्रवादीला ताबा ठेवण्याचे वेध !
भाजप पुन्हा हा गड ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे, तर महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ही हक्काची जागा भाजपला सोडण्याच्या स्थितीत दिसत नाही. तर महाविकास आघाडी अजूनही उमेदवारी ठरवण्यात मागे आहे.
अशा परिस्थितीत, पुणे पदवीधर मतदारसंघात यंदा केवळ पक्षांमध्येच नव्हे, तर महायुती आणि महाविकास आघाडी मध्येही निवडणुकीपूर्वीच जोरदार अंतर्गत लढत पाहायला मिळणार, हे निश्चित आहे !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#पुणेपदवीधरनिवडणूक #भाजप #राष्ट्रवादी #राजकारण
#महायुतीVsमहाआघाडी #सातारा #सांगली #Politics
#MaharashtraPolitics #SangaliNews
#SataraNews #KolhapurNews #PuneCityNews
#SharadLad #ArunLad #BjpVsNCP
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

0 टिप्पण्या