कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड उत्तर मतदारसंघातील भाजपचे सक्रिय आणि प्रभावी नेते रामकृष्ण श्रीमंत वेताळ यांचे पक्षातील राजकीय वजन दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भाजपने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना कोल्हापूर पूर्व अर्थात हातकणंगले मतदारसंघाचे प्रभारीपद सोपवले असून, याआधीच ते किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यामुळे वेताळ यांच्याकडे आता दुहेरी जबाबदारी आली असून, त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर पक्षाने शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे.
कराड उत्तरमध्ये वेताळ यांची संघटनात्मक पकड आणि राजकीय शैली याची झलक यापूर्वीच जिल्हा परिषद निवडणुकीत पाहायला मिळाली होती. त्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. विद्याताई रामकृष्ण वेताळ यांचे तिकीट पक्षाने ऐनवेळी कापले होते. मात्र त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली आणि उल्लेखनीय विजय मिळवला. विशेष म्हणजे, या विजयानंतर त्यांनी पुन्हा भाजपला पाठिंबा देत वेताळ यांच्या भूमिकेला पाठबळ दिले.
या संपूर्ण घडामोडीनंतरही भाजपने रामकृष्ण वेताळ यांच्यावर विश्वास कायम ठेवत त्यांची थेट किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. हा निर्णय त्यांच्या पक्षनिष्ठा आणि संघटन कौशल्याची घेतलेली दखल मानला गेला. राज्यस्तरावर संधी देत पक्षाने त्यांना पुढे आणण्याचा स्पष्ट प्रयत्न केला होता.
आता त्यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी देत भाजपने त्यांची हातकणंगले मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे कराड-सातारा पट्ट्यात वेताळ यांचा प्रभाव अधिक बळकट होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ग्रामीण भागात संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांना जोडणे आणि युवकांमध्ये प्रभाव निर्माण करणे ही वेताळ यांची खास कार्यशैली मानली जाते. त्यामुळेच पक्षाने आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, कराड आणि सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये या नियुक्तीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वेताळ यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एकूणच, कराडच्या राजकारणातून पुढे आलेल्या रामकृष्ण वेताळ यांची वाटचाल आता राज्य पातळीवर ठळकपणे दिसू लागली असून, त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#रामकृष्णवेताळ #कराडउत्तर #किसानमोर्चा #भाजप
#हातकणंगले #कोल्हापूरपूर्व #कराड #राजकारण
#चांगभलंन्यूज #चांगभलं #ChangbhalaNews

0 टिप्पण्या