कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
तालुक्यातील काही भागांमध्ये घरगुती गॅस पुरवठा मागील काही काळापासून विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कराड शहर यांच्यावतीने प्रशासनाकडे तक्रार दाखल करून संबंधित एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
तक्रारीनुसार, अनेक ठिकाणी गॅस वितरणात अनियमितता असून, बुकिंग केल्यानंतरही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. विशेष म्हणजे, काही ग्राहकांना प्रत्यक्षात सिलेंडर न मिळताच ‘वितरित झाले’ असे संदेश मोबाईलवर प्राप्त होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. त्यामुळे वितरण व्यवस्थेत तांत्रिक त्रुटी किंवा गैरव्यवहार होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित प्रकरणाची दखल घेतली व चौकशी सुरू केली.
दरम्यान, ग्राहक हितासाठी प्रभावी कार्य करणाऱ्या तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम व पुरवठा अधिकारी साहिला नायकवडे मॅडम यांनी संबंधित एजन्सीला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले. तसेच पेट्रोल व डिझेल पंपांवरील कृत्रिम टंचाईबाबतही समक्ष पाहणी करून, विविध माध्यमांद्वारे ग्राहकांमध्ये जनजागृती करत हा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
ग्राहक हितासाठी केलेल्या या कार्याची दखल घेत ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा अध्यक्षा सौ. सुनिता राजेघाटगे (कोषाध्यक्षा), श्री नंदकुमार काटे, शहर अध्यक्ष श्री. नितीन शहा, श्री दत्ताजी खुडे, डॉ. धनंजय खैर, पत्रकार श्री. प्रकाश शेलार, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे श्री. रमेश बनसोडे, श्री. समय मोदी , श्री. मनोज शहा, श्री. रशहा तसेच श्री. नंदकुमार काटे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#KaradNews #ChangbhalaNews #चांगभलं
#चांगभलंन्यूज #ग्राहकपंचायतमहाराष्ट्र

0 टिप्पण्या