कराड, दि. १८ एप्रिल | चांगभलं वृत्तसेवा
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत कराड शहरातील पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेच्या विकासासाठी तीन महत्त्वाच्या कामांचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी उत्साहात पार पडला. यामध्ये ११ लाख लिटर क्षमतेच्या उंच टाकीमधून होणाऱ्या वितरण नलिकेच्या कामासह पंपिंग स्टेशन क्रमांक २ व ४ च्या उभारणीचा समावेश आहे.
कराड नगरपालिकेच्या शहराच्या दृष्टीने महत्वाच्या या प्रकल्पांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्याने आणि कराड नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. सर्व तीन कामांचे भूमिपूजन माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, लोकशाही आघाडी अध्यक्ष व नगरसेवक जयंतकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
वितरण नलिका टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन....
शहरातील श्रीराम चौक, सूर्यवंशी मळा रोड, स्टेडियम पाठीमागे येथे गुरुवारी सकाळी १२ वाजता झालेल्या कार्यक्रमात ११ लाख लिटर क्षमतेच्या उंच टाकीमधून वितरण नलिका टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. या योजनेमुळे कराड शहर व त्याच्या वाढीव भागांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे. टाकीमुळे पाण्याचा साठा वाढून पुरवठा स्थिर होणार आहे, दाब सुधारून, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्या आणि गळती कमी होऊन पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे. पाणीटंचाई दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळणार असून स्वच्छ व सुरक्षित पाण्यामुळे आरोग्य सुधारणार आहे. शहराच्या भविष्यातील विस्ताराला अनुरूप मजबूत पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
पंपिंग स्टेशन क्रमांक - २ च्या कामाचे महत्त्व....
नाना-नानी पार्क परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजता झालेल्या कार्यक्रमात पंपिंग स्टेशन क्रमांक २ चे भूमिपूजन झाले. येळवे गल्ली, डुबल गल्ली, भैरोबा गल्ली, जुनी रॉयल टॉकी, ग्रीन पार्क, पंताचा कोट, नविन कृष्णामाई मंगल कार्यालय या भागांसाठी ही योजना महत्त्वाची आहे. सांडपाण्याचा जलद निचरा होऊन गटार तुंबणे व पाणी साचणे कमी होणार आहे. पावसाळ्यात गटार ओव्हरफ्लो व पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. स्वच्छता वाढून आरोग्यदायी वातावरण निर्माण होऊ शकेल. दूषित पाण्यामुळे होणारे आजार कमी होतील आणि नदी-नाल्यांचे प्रदूषण घटेल. भविष्यातील शहरवाढ लक्षात घेऊन टिकाऊ व्यवस्था उभी राहू शकेल, असे या पंपिंग स्टेशनचे फायदे आहेत.
पंपिंग स्टेशन क्रमांक - ४ च्या कामाचे महत्व....
वैकुंठधाम स्मशानभूमी परिसरात गुरुवारी सकाळी १० वाजता झालेल्या कार्यक्रमात पंपिंग स्टेशन क्रमांक ४ चे भूमिपूजन करण्यात आले. सोमवार पेठ, कुंभारवाडा, कमळेश्वर मंदिर, करडीपीर, स्मशानभूमी परिसर या भागांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन पाणी साचण्याच्या समस्या कमी होणार आहेत. पावसाळ्यातील पूरस्थिती टाळता येऊ शकेल. आरोग्याशी संबंधित धोके कमी होऊन स्वच्छता वाढेल आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापनामुळे प्रदूषण नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे. वाढत्या लोकसंख्येला अनुरूप दीर्घकालीन मलनिस्सारण व्यवस्था यामुळे निर्माण होऊ शकणार आहे.
दोन्ही पंपिंग स्टेशन प्रकल्पांमुळे कराड शहर अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनण्यास मदत होणार असून, सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना स्वच्छता व आरोग्य समिती सभापती अरुणा सुरेश पाटील, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती अल्ताफ शिकलगार, बांधकाम सभापती अख्तरहुसेन आंबेकरी, महिला व बालकल्याण सभापती रुपाली अभिजीत माने, नियोजन व विकास समिती सभापती आशा पांडुरंग मुळे, नगरसेवक प्रवीण पवार, रजिया आंबेकरी, जयवंत पाटील, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह सर्व नगरसेवक, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#KaradNews #KaradCity #ChangbhalaNews
#चांगभलंन्यूज #कराड #कराडनगरपालिका



0 टिप्पण्या