🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा कारखान्यात सत्तासंग्रामाची चाहूल; ‘सहकार विरुद्ध संस्थापक’ लढत रंगणार ; 'रयत'ची भूमिका अस्पष्ट !

 


हैबत आडके, कराड | चांगभलं वृत्तसेवा

कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक (शिवनगर) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नसली, तरी कार्यक्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आल्याने सत्तासंग्रामाची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. जून महिन्यात निवडणूक कार्यक्रम अपेक्षित असला, तरी गेल्या महिनाभरापासूनच सत्ताधारी आणि विरोधी गटांनी ‘आधी तयारी, मग निवडणूक’ या सूत्रावर जोर देत आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
बैठका, गाठीभेटी, सत्कार समारंभ आणि सामाजिक कार्यक्रमांमधील वाढलेली उपस्थिती हे केवळ योगायोग नसून, निवडणुकीपूर्वीचे ‘सॉफ्ट कॅम्पेनिंग’ असल्याचे स्पष्ट संकेत कार्यक्षेत्रातून मिळत आहेत. सुमारे ६५ वर्षांची परंपरा असलेला आणि ४७ हजारांहून अधिक सभासदांची मालकी असलेल्या या कारखान्याचे कार्यक्षेत्र दोन जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

सत्ताधाऱ्यांची ‘मायक्रो मॅनेजमेंट’ रणनीती; संपर्क मोहिमेचा धडाका...

सहकार पॅनेलचे मार्गदर्शक विद्यमान चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कार्यक्षेत्रात संपर्क दौरे, बैठका आणि राजकीय संवाद यावर भर देत संघटनात्मक पकड अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये त्यांना दोन जिल्ह्यातील भाजपचे नेटवर्क कामी येताना दिसत आहे.
शिराळा, वाळवा आणि कडेगाव या भागांतील प्रभावी नेत्यांच्या भेटीगाठींना विशेष राजकीय अर्थ प्राप्त झाला आहे. माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक यांच्याशी झालेल्या संवादातून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक समीकरणांना नव्याने आकार देण्याचे संकेत मिळत आहेत.
त्यातच आमदार जयंत पाटील यांच्यासोबत तांबवे येथील कार्यक्रमात झालेली एकत्रित उपस्थिती ही केवळ औपचारिकता नसून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘स्ट्रॅटेजिक सिग्नल’ मानली जात आहे. सत्ताधाऱ्यांनी संघटन, सत्ता आणि संसाधनांचा समन्वय साधत ‘मायक्रो मॅनेजमेंट’वर भर दिल्याचे चित्र स्पष्ट दिसते आहे.

संस्थापक पॅनेलचा ‘ग्राउंड कनेक्ट’ फॉर्म्युला; शांत पण प्रभावी मोर्चेबांधणी....

दुसरीकडे, माजी चेअरमन अविनाशदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. अर्चनाताई मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनेलने ‘ग्राउंड कनेक्टिव्हिटी’वर भर देत शांतपणे पण प्रभावीपणे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
अर्चनाताई मोहिते धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमधून थेट सभासदांशी संवाद साधत ‘भावनिक आणि वैयक्तिक संपर्क’ मजबूत करताना दिसत आहेत. कासेगाव येथील धार्मिक कार्यक्रम, मच्छिंद्रगड यात्रा, तसेच विविध स्थानिक कार्यक्रमांतील त्यांची वाढती उपस्थिती ही निवडणुकीपूर्वीची सुसूत्र रणनीती असल्याचे संकेत देत आहे.
संस्थापक पॅनेल ‘पूर्वीची ठसीव कामगिरी, लोकभावना, परंपरा आणि विश्वास’ या चतुुु:सूत्रीवर भर देत मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे.

२०२१ विरुद्ध २०२६: बदलती समीकरणे...चुरशीची लढत..

२०२१ मध्ये सहकार पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला असला, तरी २०२६ मध्ये लढत अधिक चुरशीची होऊ शकते, याचे सध्याच्या राजकीय हालचालींवरून स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सत्ताधाऱ्यांकडे गत दहा वर्षांची कामगिरी, मजबूत संघटना, सत्तेचा पाठिंबा आणि संसाधनांची ताकद आहे.
तर विरोधकांकडे त्यांच्या सत्ता काळातील ठसा उमटवणारी कामगिरी, लोकभावना, परंपरा आणि ‘ग्राउंड कनेक्टव्हिटी’ ही ताकद आहे.


नव्या चेहऱ्यांचा शोध; स्थानिक समीकरणांवर लक्ष...

दोन्ही गटांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून, स्थानिक प्रभाव, सामाजिक समीकरणे आणि निवडणूक गणिते यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.
यंदा काही जागांवर ‘नवीन आणि निर्णायक चेहरे’ संधी मिळविण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने दोन्ही पॅनेलने पडद्यामागे हालचाली वेगात सुरू केल्या आहेत.

कामगिरी विरुद्ध आठवणींचा मुद्दा; प्रचाराचे दोन वेगवेगळे ट्रॅक...

सहकार पॅनेलचा मुख्य आधार म्हणजे अलीकडील आर्थिक कामगिरी -
१४.१९ लाख मेट्रिक टन गाळप, प्रतिटन ३५०० रुपये दर आणि ५०० कोटींपेक्षा अधिक थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, ही आकडेवारी प्रचाराचे प्रमुख अस्त्र ठरणार आहे.
तर संस्थापक पॅनेल २०१०-२०१५ मधील ‘सुवर्णकाळ’ अधोरेखित करत आहे -
कामगारांना २५% बोनस, सभासद हिताचा पारदर्शक कारभार, शेअर ट्रान्सफरमध्ये समानता आणि यांत्रिकीकरणाद्वारे वाढलेली उत्पादनक्षमता, हे मुद्दे भावनिक आणि विश्वासार्हतेच्या पातळीवर मांडले जात आहेत.

मोहिते गटाची भूमिका अनिश्चित; राजकीय उत्सुकता शिगेला...


या सर्व घडामोडींमध्ये रयत पॅनलचे प्रमुख नेते, माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ते कारखान्याच्या यावेळच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, तटस्थ राहणार की कोणत्या पॅनेलला पाठिंबा देणार? याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने कार्यक्षेत्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


एकूणच कारखान्याची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली, तरी कार्यक्षेत्रात नैसर्गिक तापमानाबरोबरच राजकीय तापमान ही दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
सत्ताधारी ‘कामगिरी’च्या जोरावर, तर विरोधक ‘विश्वास आणि परंपरे’च्या आधारावर मैदानात उतरताना दिसत आहेत.
आगामी काळात ‘सहकार विरुद्ध संस्थापक’ ही लढत आणखी तीव्र होत जाणार असून, 'रयत'च्या भूमिकेलाही महत्व प्राप्त होणार आहे. कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोर-बैठकांना सुरुवात झाली असली तरी अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे.. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणत्या घडामोडी घडतात? प्रचारात कोणते मुद्दे सभासदांना प्रभावित करतात? राजकीय गोळा बेरीज कशी केली जाते? याकडे आता सातारा व सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #KrishanaElection #सहकारVsसंस्थापक

#कृष्णाकारखानानिवडणूक2026 #सहकारपॅनेल #संस्थापकपॅनेल

#रयतपॅनेल #साताराजिल्हा #सांगलीजिल्हा #चांगभलंन्यूज

#ChangbhalaNews #चांगभलं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या