कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
"केवळ गुणपत्रिकेवरील टक्केवारी म्हणजे यश नव्हे, तर मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी करणे हेच खरे शिक्षण आहे. स्पर्धात्मक युगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड द्यावी," असे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समध्ये आयोजित 'वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२५-२६' मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कराड तर्फे दिला जाणारा यशवंत-वेणू पुरस्कार आपल्याला मिळाल्याचे सांगून डॉ . शिंदे पुढे म्हणाले, विज्ञानाच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे. तसेच प्रत्येकाने आपल्यातले असामान्यत्व ओळखायला शिकले पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळाचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला म्हणाले की, "या महाविद्यालयाने NAAC आणि SQAAF या दोन्ही संस्थांकडून 'A+' मानांकन मिळवून कराडच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा आमचा संकल्प या यशामुळे अधिक दृढ झाला आहे."
या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त व सदस्य अरुण पांडुरंग पाटील, दिलीप दादासाहेब चव्हाण, नंदकुमार लक्ष्मणराव बटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून महाविद्यालयाच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा मांडला.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ताधारक विविध विषयांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, तसेच राष्ट्रीय व राज्य स्तरावर चमकलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. वक्तृत्व, कला आणि इतर स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व.यशवंतराव चव्हाण साहेब आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. डी. पाटीलसाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्याध्यक्ष प्रा. डॉ.ए.टी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कीर्ती यादव,व्ही. बी.जाधव यांनी केले. आभार डॉ.जे.यु.पाटील यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#YCCOLLAGE #YCCollageKarad #KaradNews
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज #चांगभलं

0 टिप्पण्या