![]() |
चांगभलं प्रतिनिधी | कराड
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहरातील बहुप्रतिक्षित ‘युनिक’ सहापदरी उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सातारा ते कोल्हापूर दिशेकडील एका मार्गिकेवरून हलक्या चारचाकी वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली असून, त्यामुळे कराड व मलकापूर परिसरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजप नेते धैर्यशील कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, शेंद्रे ते कागल या महामार्ग विस्तारीकरण प्रकल्पाचे सुमारे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसह विविध अडचणींचा सामना करावा लागला असला, तरी आता बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेंद्रेपासून सांगली जिल्ह्याच्या सीमेपर्यंतचे बहुतांश काम पूर्ण झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागातील कामे अद्याप सुरू आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी आणि संबंधित यंत्रणा प्रकल्पाचा सातत्याने आढावा घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा हा आधुनिक सहापदरी उड्डाणपूल कराड शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहनसंख्या, शहरातील प्रमुख चौकांवरील गर्दी आणि वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात आला. उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दूरपल्ल्याच्या वाहनांना शहरात प्रवेश न करता अखंड प्रवास करता येणार असून वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील वाहतूक सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात आलेला हा प्रकल्प कराडच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा बदल घडवून आणणार असून शहराच्या विकासालाही चालना देणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
३० जूनपर्यंत दुसरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली...
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, कोल्हापूर ते सातारा दिशेकडील दुसऱ्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून ती ३० जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिका सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कराड शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन पुणे-कोल्हापूर महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या