हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, रेठरे बुद्रुकच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रचाराचे रणधुमाळी आज सायंकाळी थांबणार असून रविवार, दि. २१ जून रोजी मतदान होणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दोन जिल्ह्यातील व चार तालुक्यांतील तब्बल १५३ मतदान केंद्रांवर ५० हजारांहून अधिक सभासद मतदानाचा हक्क बजावणार असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, दुरंगी लढतीमुळे शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला असून कार्यक्षेत्रात निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र कराड, वाळवा, कडेगाव आणि खानापूर या चार तालुक्यांमध्ये विस्तारलेले आहे. दोन जिल्ह्यांतील तब्बल १३० गावांचा समावेश असलेल्या या कार्यक्षेत्रात कराड तालुक्यातील ६५, वाळवा तालुक्यातील ४२, कडेगाव तालुक्यातील २० आणि खानापूर तालुक्यातील ३ गावे येतात. विस्तीर्ण कार्यक्षेत्र आणि सहकार क्षेत्रातील कारखान्याचे महत्त्व लक्षात घेता या निवडणुकीकडे राज्यभरातील सहकार वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यात ८९ तर सांगली जिल्ह्यात ६४ अशा एकूण १५३ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून मतदारांनी मतदानाला येताना निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. मूळ ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नसल्याने सभासदांनी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या मतदारसंख्येवर नजर टाकल्यास ऊस उत्पादक गटांमध्ये गट क्रमांक २ (काले-कार्वे) येथे सर्वाधिक ९ हजार ४८१ मतदार आहेत. त्याखालोखाल गट क्रमांक १ (वडगाव हवेली-दुशेरे) मध्ये ९ हजार २७६, गट क्रमांक ३ (नेरले-तांबवे) मध्ये ८ हजार ८८३, गट क्रमांक ४ (रेठरे हरणाक्ष-बोरगाव) मध्ये ८ हजार ६०४, गट क्रमांक ६ (रेठरे बुद्रुक-शेणोली) मध्ये ७ हजार ६८१ तर गट क्रमांक ५ (येडेमच्छिंद्र-वांगी) मध्ये ६ हजार ३२७ मतदार आहेत. कारखान्याची एकूण मतदारसंख्या ५० हजार २५२ इतकी आहे.
याशिवाय अनुसूचित जाती-जमाती, महिला, इतर मागास प्रवर्ग तसेच विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी राखीव जागांची तरतूद असून विविध प्रवर्गांना संचालक मंडळात प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे.
७८ संवेदनशील केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण...
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. कार्यक्षेत्रातील ७८ संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यक मनुष्यबळ, निवडणूक साहित्य आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रिया मंगळवार, दि. २३ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून बाजार समिती गेट क्रमांक ६ येथील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी सांगितले. दरम्यान, दुरंगी लढतीमुळे निकालाकडे सभासदांसह संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असून मतदानात मोठ्या प्रमाणावर सभासदांचा सहभाग राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गटनिहाय मतदार संख्या...
गट क्रमांक १ - वडगाव हवेली- दुशेरे मतदार - ९,२७६
गट क्र. २ काले - कार्वे मतदार - ९,४८१
गट क्र. ३ नेरले - तांबवे मतदार - ८,८८३
गट क्र. ४ -रेठरे हरणाक्ष - बोरगाव मतदार- ८,६०४
गट क्र. ५ येडेमच्छिंद्र - वांगी मतदार - ६,३२६
गट क्र. ६ रेठरे बुद्रुक - शेणोली मतदार - ७,६८१
कार्यक्षेत्रातील तालुकानिहाय समाविष्ट गावे...
कराड - ६५ गावे
वाळवा - ४२ गावे -
कडेगाव - २० गावे
खानापूर - ३ गावे
एकूण - १३० गावे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #कृष्णानिवडणूक
#सातारा #सांगली #कराड #वाळवा #कडेगाव #खानापूर
#चांगभलं #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक
#चांगभलंवृत्तपत्र #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंन्यूज

0 टिप्पण्या