चांगभलं प्रतिनिधी | कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संस्थापक पॅनेलला संपूर्ण ताकदीने पाठिंबा जाहीर केला आहे. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, संस्थापक पॅनेलच्या नेत्या व उमेदवार सौ. अर्चनाताई मोहिते, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कृष्णा कारखाना निवडणुकीबाबत काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर सर्वानुमते संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
"मी स्वतः कारखान्याचा सभासद नसल्याने माझा या निवडणुकीशी काय संबंध, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र १९९१ पासून या भागातील जनतेने मला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सातत्याने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या भागातील लोकांच्या सुख-दुःखाशी माझे नाते कायम आहे. सहकार हा केवळ आर्थिक विषय नसून ग्रामीण भागाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाशी निगडित असल्याने त्याकडे बघ्याची भूमिका घेणे योग्य ठरणार नाही," असे ते म्हणाले.
सहकार आणि राजकारण वेगळे असल्याचा काहीजण दावा करत असले तरी, प्रत्यक्षात आजची परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत चव्हाण यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकीय ताकद उभारण्याची प्रवृत्ती वाढल्याची टीका केली. साखर कारखाने, सहकारी बँका, दूध संस्था आणि इतर आर्थिक संस्थांचा वापर राजकीय वर्चस्वासाठी केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, "कारखान्याचा वापर बेकायदेशीर मार्गाने निवडणुका जिंकण्यासाठी आणि विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी होत असेल, तर काँग्रेस पक्षाला त्याची दखल घ्यावी लागेल. याच भूमिकेतून काँग्रेस पक्ष संस्थापक पॅनेलच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहिला आहे,"
लोकशाहीसमोरील आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी पक्षफोडीच्या राजकारणावरही टीका केली. विचारांच्या राजकारणाला दुय्यम स्थान मिळत असून आर्थिक शक्तीच्या बळावर राजकीय समीकरणे बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सहकारी संस्था या सभासदांच्या हितासाठी आणि पारदर्शक पद्धतीने चालल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करत कृष्णा साखर कारखान्याचे व्यवस्थापन निष्पक्ष आणि लोकहिताच्या दृष्टीने होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
'सहकारातील अर्थकारणातून राजकारणाला बळ'...
आजच्या काळात सहकारी संस्था आणि राजकारण यांचे नाते अधिक घट्ट झाले आहे. साखर कारखाना, सहकारी बँक, दूध संस्था किंवा इतर आर्थिक संस्था नसतील तर सामान्य व्यक्तीला निवडणूक राजकारणात टिकणे अवघड झाले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या आर्थिक ताकदीचा वापर लोकहितासाठी व्हावा, राजकीय वर्चस्वासाठी नव्हे, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #पृथ्वीराजचव्हाण
#संस्थापकपॅनेल #राष्ट्रीयकाँग्रेसपाठिंबा #साप्ताहिकचांगभलं
#चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलं

0 टिप्पण्या