चांगभलं प्रतिनिधी | कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजता कराड येथील शासकीय गोदामात मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडत असून मतमोजणी दोन फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे.
मतमोजणीच्या प्रारंभी मतदान केंद्र क्रमांक १ ते ७७ या सर्व केंद्रांवरील मतपत्रिकांचे गटनिहाय (रंगानुसार) एकत्रीकरण ७७ स्वतंत्र टेबलांवर सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सकाळी ११ वाजेपर्यंत चालण्याची शक्यता असून त्यानंतर प्रत्यक्ष गटनिहाय मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विविध गटांतील उमेदवारांच्या मतांच्या आघाडी-पिछाडीचे चित्र टप्प्याटप्प्याने स्पष्ट होणार आहे.
अशी होत आहे प्रत्यक्ष मतमोजणी....
पहिल्या फेरीत कराड तालुक्यातील सर्व गावांबरोबरच वाळवा तालुक्यातील तांबवे, पेठ, नेरले, काळमवाडी, कासेगाव, वाटेगाव आणि कापूसखेड या गावांतील मतदान केंद्रांचा समावेश आहे. दुसऱ्या फेरीत मतदान केंद्र क्रमांक ७८ ते १५३ मधील वाळवा तालुक्यातील उर्वरित गावे तसेच खानापूर व कडेगाव तालुक्यातील मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी केली जाणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेनुसार पहिली फेरी ७७ टेबलांवर, तर दुसरी फेरी ७६ टेबलांवर पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक टेबलावर संबंधित पॅनलचा एक मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मतमोजणीचा क्रम अनुसूचित जाती-जमाती, महिला प्रतिनिधी, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या राखीव गटांपासून सुरू होणार आहे. त्यानंतर वडगाव हवेली-दुशेरे, काले-कार्वे, नेरले-तांबवे, रेठरे हरणाक्ष-बोरगाव, येडेमच्छिंद्र-वांगी आणि शेवटी रेठरे बुद्रुक-शेणोली या गटांची मतमोजणी केली जाणार आहे. पहिल्या फेरीत आघाडी समजणार असली तरी दुसऱ्या फेरीमध्ये अंतिम निकाल समजू शकणार आहे. मात्र दुसऱ्या फेरीचे अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत घोषित होऊ शकतात.
मतमोजणीपूर्वीच अफवांचे पीक...
दरम्यान, प्रत्यक्ष मतमोजणीचा कोणताही अधिकृत कल अद्याप समोर आलेला नसतानाच कार्यक्षेत्रात अफवांचे पीक फोफावू लागले आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर उभारण्यास सुरुवात केली असून, काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही होत आहे. सोशल मीडियावर विविध दावे करणारे संदेश आणि स्टेटस मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत. त्यामुळे मतदार सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुपारनंतर अनुसूचित जाती-जमाती गटाच्या मतमोजणीचे प्राथमिक कल समोर येण्याची अपेक्षा असून त्यानंतर निवडणुकीतील आघाडी-पिछाडीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #कृष्णाकारखाना
#सहकारपॅनेल #संस्थापकपॅनेल #निवडणूक #चांगभलं
#साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंन्यूज


0 टिप्पण्या