हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या सुवर्णक्षणाची आठवण जागवत कराडमध्ये जेष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या निमित्ताने तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन मोठ्या भक्तिभावाने आणि दिमाखात साजरा करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात शेकडो शिवप्रेमींनी सहभाग घेत शिवरायांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि विधिवत अभिषेकाने झाली. विविध गड-किल्ल्यांवरून आणलेल्या पवित्र जलासह दूध, दही, तूप आणि पंचामृताने शिवरायांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. पाच दांपत्यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात धार्मिक विधी पार पडला. त्यानंतर शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी नतमस्तक होत अभिवादन केले.
भगवे फेटे परिधान केलेल्या शिवभक्तांनी ‘जय भवानी... जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. उत्साहपूर्ण वातावरणात राजधानी रायगडावरील ऐतिहासिक परंपरेचे स्मरण करत शिवरायांच्या मूर्तीची पालखी शहरातील ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी काढण्यात आली. शिवतीर्थ येथून सुरू झालेल्या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले. विविध देवस्थानांना भेट दिल्यानंतर पालखी पुन्हा शिवतीर्थ, दत्त चौक येथे दाखल झाली आणि सोहळ्याची सांगता झाली.
या कार्यक्रमात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी, शिवभक्त, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान, शौर्य आणि समाजसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सोहळ्यानिमित्त शिवतीर्थ परिसर भगव्या ध्वजांनी, आकर्षक पताका आणि फुलांच्या सजावटीने नटला होता. उत्सवी वातावरणामुळे परिसराला विशेष आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. कार्यक्रम सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
➖➖➖➖➖➖➖➖
#शिवराज्याभिषेक #श्रीशिवप्रतिष्ठान #धारकरी #शिवतीर्थ
#कराड #शिवभक्त #कराडशहर #KaradNews
#चांगभलं #चांगभलंन्यूजपेपर #साप्ताहिकचांगभलं
#चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंवर्तमानपत्र #चांगभलंन्यूज


0 टिप्पण्या