🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

शाहू महाराजांच्या विचारांवर समाज एकवटावा; जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आनंदराव लादे यांचे आवाहन

 




हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील शाहू चौकात त्यांच्या पुतळ्यास विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय, समता आणि सामाजिक सलोखा या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन करत भीमशक्तीचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा समता सामाजिक संस्थेचे आनंदराव लादे यांनी समाजात जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर टीका केली.
यावेळी बोलताना आनंदराव लादे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणासह सर्वसमावेशक धोरणाचा पुरस्कार केला होता. मात्र त्यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात काही व्यक्ती राजकीय स्वार्थातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा समाजकंटक प्रवृत्तींना जनता बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
अलीकडे करण्यात आलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, काही मंडळी राजकीय सुपारी घेऊन समाजात संघर्षाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्ती ना आंबेडकरवादी आहेत, ना मानवतावादी. उलट त्या समाजात द्वेष, फूट आणि जातीय ध्रुवीकरण घडवून आणण्याचे काम करत असल्याने समाजाने त्यांना ठामपणे विरोध केला पाहिजे.
उपवर्गीकरणाच्या विषयावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. या प्रश्नाला आमचा विरोध नसला तरी हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने घाईघाईने निर्णय घेऊ नये. मातंग, बौद्ध आणि इतर संबंधित समाजातील अभ्यासू व जाणकार व्यक्तींना एकत्र करून समिती स्थापन करण्यात यावी. त्या समितीच्या वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारेच सरकारने उपवर्गीकरणाबाबत अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची संकल्पना मांडली होती. त्यामुळे आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थाने मागास व गरजू समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासपूर्ण निर्णय होणे आवश्यक आहे. या विषयावर संघर्ष नव्हे तर संवाद आणि विचारमंथन व्हावे, असेही लादे यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी आरएसएस आणि आंबेडकरविरोधी विचारसरणीच्या काही प्रवृत्ती समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. मातंग आणि बौद्ध समाजाने अशा प्रवृत्तींविरोधात एकजुटीने उभे राहून सामाजिक सलोखा कायम राखावा, असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल होत असल्याचे सांगत, कोणाच्याही चिथावणीखोर वक्तव्यांमुळे समाजात फूट पडू दिली जाणार नाही. आवश्यकता भासल्यास अशा प्रवृत्तींना लोकशाही मार्गाने जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दत्तात्रय दुपटे यांनीही यावेळी आपले मत व्यक्त करत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि महापुरुषांची भूमी असून संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सखोल अभ्यास झाला असता, तर अशा प्रकारची विधाने झाली नसती, असे त्यांनी सांगितले. उपवर्गीकरणासारख्या महत्त्वाच्या विषयावर शासनाने सर्व संबंधित घटकांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
या अभिवादन कार्यक्रमास शिवसेनेचे शशिराज करपे, भीम आर्मीचे सातारा जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे, सूर्यकांत बनसोडे, जान फाउंडेशनचे जावेद नायकवडी, संजय रुद्राक्ष, अशोक भोसले, संजय कांबळे, दत्तात्रय दुपटे, शामराव मोहिते, कांबळे सर, राजकुमार लादे, पै. अमोल साठे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖

#कराड #राजर्षीशाहू #जयंती #कराडकर #आरक्षणउपवर्गीकरण

#चांगभलं #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंसाप्ताहिक

#साप्ताहिकचांगभलं #चांगभलंन्यूज #KaradNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या