हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने कृषी दिन व उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात कराड तालुक्यातील दोन प्रगतिशील शेतकऱ्यांसह पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी पवनकुमार जयवंतराव गायकवाड यांना उत्कृष्ट कृषी विस्तार अधिकारी पुरस्काराने तर उत्कृष्ट कृषी अधिकारी पुरस्काराने मिलिंद भोईटे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम बुधवारी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, येथे पार पडला. या कार्यक्रमात शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत शेती पद्धती आणि उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. जे. के. बसू सेंद्रिय शेती पुरस्कार कराड तालुक्यातील हिंमतराव पाटील (सुपने, ता. कऱ्हाड), उमेश कुलकर्णी (कुळकजाई, ता. माण), मद्रावती धुमाळ (सोनके, ता. कोरेगाव), सूर्यकांत अडसूळ (वडजल, ता. फलटण), दत्तात्रय जाधव (पुसेगाव, ता. खटाव) यांना प्रदान करण्यात आला.
स्व. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन शेती पुरस्कार कराड तालुक्यातील साळशिरंबे येथील मारुती पाटील यांच्यासह विक्रमसिंह कदम (भरतगाव, ता. सातारा), रवींद्र धुमाळ (धुमाळवाडी, ता. फलटण), डॉ. बापूराव चोपडे (सुखेड, ता. खंडाळा), जितेंद्र कदम (रायगाव, ता. जावळी) यांना प्रदान करण्यात आला. पुष्पोत्पादन पुरस्काराने नामदेव धनावडे (करंजे, ता. जावळी), शंकर शिंदे (लिंब, ता. सातारा) व दिलीप शिंगटे (खडकी, ता. वाई) यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच दुग्धोत्पादन क्षेत्रातील कामगिरीबद्दल रवींद्र इथापे (अमृतवाडी, ता. वाई), विनोद शेलार (एकसळ, ता. कोरेगाव), दादासाहेब काळे (आंधळी, ता. माण), भरत शेडगे (गारवाडी, ता. खटाव), उत्तम सुपुगडे (मुळगाव, ता. पाटण), सयाजीराव गायकवाड (बेलवडे, ता. जावळी), राहुल जाधव (करंडी, ता. सातारा) या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांच्या नियोजनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
कराड तालुक्याच्या कृषी विभागाचा उचित सन्मान....
कराड तालुका आकार व विस्ताराने मोठा आहे, शेती क्षेत्र खूप आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. कराड पंचायत समितीची कृषी विभागाची धुरा कृषी विस्तार अधिकारी पवनकुमार गायकवाड यांनी उत्कृष्ट पद्धतीने सांभाळली आहे. शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या गायकवाड यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला पुरवण्याचे काम हाती घेतले आहे. कराड तालुक्यामध्ये रुजू झाल्यानंतर या युवा अधिकाऱ्याने कृषी विभाग व तालुक्यातील शेतकरी यांच्यातील समन्वय भक्कम करण्याला प्राधान्य दिले आहे. कराड बाजार समितीने घेतलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या नियोजनात कृषी विभागाच्यावतीने पवनकुमार गायकवाड यांनी प्रभावी काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत जिल्हा परिषदेने त्यांना उत्कृष्ट कृषी विकास अधिकारी पुरस्कार प्रदान करून पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कामगिरीला त्यामुळे आणखी बळ मिळणार आहे.
राज्य शासनाच्या पुरस्कारामध्येही कराडची बाजी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा राज्यपातळीवरील "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार श्री. हिम्मतराव हिंदुराव पाटील राहणार पश्चिम सुपने तालुका कराड यांना मा. श्री. जिष्णु देव वर्मा मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, श्री दत्तात्रय भरणे मा. मंत्री, कृषी, महाराष्ट्र राज्य, श्री इंद्रनील नाईक मा. राज्यमंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र राज्य, एड. आशिष जयस्वाल मा. राज्यमंत्री, कृषी, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृषीपुरस्कार #साताराजिल्हापरिषद #कराडपंचायतसमिती
#कृषीविभाग #कराड #कराडकर #शेतीपुरस्कार #चांगभलं
#चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं




0 टिप्पण्या