हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ . वैशाली कडुकर यांच्या आदेशानुसार भरोसा सेल, सातारा यांच्यावतीने पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांशी समोरासमोर संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जीवनातील घरगुती अडचणी, सामाजिक समस्या तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः बँक खात्यांशी संबंधित ओटीपी, एटीएम माहिती किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी पडू नये व आर्थिक फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांना सांगण्यात आले की, कोणतीही अडचण, भीती किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यास त्यांनी तात्काळ ११२ किंवा १०९१ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच प्रवासादरम्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणी त्रास देत असल्यास अथवा अपमानास्पद वर्तन करत असल्यास पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार असून पोलीस प्रशासन त्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी भरोसा सेल, सातारा येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा संतोष पवार व महिला पोलीस कॉन्स्टेबल शेहनाज शेख यांनी सहभाग घेतला. तसेच ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रवीण दाईगडे व गोपनीय अंमलदार नवनाथ कुंभार यांच्या सहकार्याने ढेबेवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची बैठक यशस्वीरीत्या पार पडली.
या बैठकीमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून पोलिसांविषयी विश्वास व आदर निर्माण झाला आहे. पोलीस हे केवळ कायदा व सुव्यवस्थेसाठी नसून समाजातील प्रत्येक घटकासाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खंबीर आधारस्तंभ आहेत, हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
➖➖➖➖➖➖➖➖
#सातारापोलीस #ज्येष्ठनागरिकजनजागृती #भरोसासेल
#ढेबेवाडीपोलीसठाणे #बँकफसवणूक #चांगभलं
#चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं
#ज्येष्ठांचीफसवणूकप्रतिबंध #चांगभलंन्यूज


0 टिप्पण्या