आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर; तरीही कामे रखडल्याने मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब, 'बोंबाबोंब आंदोलन'चा इशारा
कराड शहरातील रस्ते विकासासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन तब्बल ४५ रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी व कार्यादेश (वर्क ऑर्डर) मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष कामांना सुरुवात न झाल्याने भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजपचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी कराड पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची भेट घेत रखडलेल्या विकासकामांबाबत जाब विचारला. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, मंजूर निधीची कामे तातडीने सुरू करावीत, अन्यथा पालिका कार्यालयात 'बोंबाबोंब आंदोलन' छेडण्यात येईल, असा इशारा भाजपच्या शिष्टमंडळाने दिला.
बैठकीदरम्यान नगरसेवक आशुतोष डुबल, शिवाजी पवार, अजय पावसकर, सुमित जाधव, गणेश पवार, वैष्णवी वायदंडे, सुहास जगताप, सूरज माने, अतुल शिंदे आणि सचिन वास्के उपस्थित होते.
रस्त्यांसह अनेक प्रश्नांवर जोरदार चर्चा...
बैठकीत शहरातील विविध प्रलंबित प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामध्ये बीपीएल गॅस पाईपलाईनची कामे, एअरटेल केबल टाकल्यानंतरची दुरवस्था, बैलबाजार रोडचे रखडलेले काम, प्रीतीसंगम उद्यानातील गैरव्यवस्था, ड्रेनेज स्वच्छता, धोकादायक झाडांच्या फांद्या तसेच बीएलओ शिबिराच्या नियोजनातील त्रुटी यांचा समावेश होता.
प्रीतीसंगम उद्यानातील अलीकडील प्रकाराची गंभीर दखल घेत चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी बैठकीत दिली.
"नागरिकांचा गैरसमज दूर करा"...
यावेळी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, ४५ रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर झाला असून पालिकेकडे निधी उपलब्ध आहे. त्यामुळे ही कामे होणार नाहीत, असा नागरिकांमध्ये निर्माण झालेला गैरसमज प्रशासनाने तातडीने दूर करावा.
कामे एक ते दोन महिन्यांत सुरू होणार असल्यास त्याबाबत अधिकृत माहिती पत्रकार परिषद घेऊन नागरिकांसमोर मांडावी, अशी मागणीही करण्यात आली.
कंपन्यांची तातडीने बैठक घ्या...
बीपीएल गॅस पाईपलाईन आणि केबल टाकणाऱ्या संबंधित कंपन्यांमुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता, संबंधित कंपन्यांची तातडीने बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवकांनी दिला.
भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे कराड शहरातील रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता प्रशासन यावर कितपत वेगाने कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या