चांगभलं प्रतिनिधी | रत्नागिरी
कोकणातील जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या गणपतीपुळेच्या सर्वांगीण विकासासाठी आता दीर्घकालीन नियोजनाला वेग मिळणार आहे. पर्यटन व्यवस्थापन, पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सुविधा आणि पर्यावरण संवर्धन या सर्व बाबींचा समन्वय साधत पुढील २० वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
गणपतीपुळे येथे शुक्रवारी झालेल्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. समुद्रकिनाऱ्यावर अलीकडील घडलेल्या दुर्घटनांची गंभीर दखल घेत त्यांनी पर्यटकांच्या जीवित सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
समुद्रकिनाऱ्यावर 'झिरो अपघात' हे उद्दिष्ट ठेवून जीवनरक्षकांची संख्या वाढविणे, अत्याधुनिक बचाव साहित्य उपलब्ध करणे, आवश्यकतेनुसार स्पीड बोटची व्यवस्था करणे आणि अनधिकृत वॉटर स्पोर्ट्सवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. सरपंच, श्रीदेव गणपतीपुळे संस्थान आणि ग्रामपंचायतीने परस्पर समन्वयाने काम करावे, अन्यथा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
वाढत्या पर्यटकसंख्येचा विचार करून गणपतीपुळेसाठी २० वर्षांचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. यामध्ये वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण, पार्किंग क्षमतेत वाढ, आवश्यक भूसंपादन, रस्त्यांचे रुंदीकरण, पादचारी मार्गांचा विस्तार आणि पर्यटन सुविधांचे नियोजनबद्ध उन्नतीकरण यांचा समावेश असेल. एमटीडीसीसह उपलब्ध जागांचा प्रभावी वापर करून भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकासकामे हाती घेण्यावर भर देण्यात आला.
स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ म्हणून गणपतीपुळेची ओळख अधिक मजबूत करण्यासाठी 'प्लास्टिकमुक्त गणपतीपुळे' अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता अधिक सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामपंचायत, संस्थान आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी संयुक्तपणे कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
पर्यटकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरओ आधारित पाणी केंद्रे उभारण्याचे तसेच कायमस्वरूपी हेल्थ सेल सुरू करून आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले. पाणीपुरवठा योजनांसाठी केवळ शासनाच्या निधीची प्रतीक्षा न करता उपलब्ध स्थानिक निधीतून तातडीने आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.
परिसरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देत पर्यटनस्थळाचा नियोजित विकास करण्यावर भर देण्यात आला. यासोबतच पोलीस, आरटीओ, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि अन्य संबंधित विभागांचा समावेश असलेली संयुक्त समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णयही बैठकीत पुढे आला.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायत, श्रीदेव गणपतीपुळे संस्थान आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन, सुरक्षितता आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधत गणपतीपुळेला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
➖➖➖➖➖➖➖➖
Keywords
Ganpatipule Development Plan
Ganpatipule Master Plan
Ratnagiri Tourism News
Ganpatipule Beach Safety
Ganpatipule Latest News
Ratnagiri Collector Manoj Jindal
Konkan Tourism
Ganpatipule Tourist Safety
Maharashtra Tourism
Plastic Free Ganpatipule
Ganpatipule Parking Plan
Ganpatipule Infrastructure Development
Ratnagiri News
Changbhala News
हॅशटॅग
#Ganpatipule #Ratnagiri #Konkan #MaharashtraTourism #GanpatipuleBeach #TourismNews #TouristSafety #MasterPlan #BeachSafety #PlasticFree #RatnagiriNews #TravelMaharashtra #VisitKonkan #ChangbhalaNews #चांगभलं #चांगभलंसाप्ताहिक

0 टिप्पण्या