🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

शिवराष्ट्र युवक संघटनेची कराड बैठक : खाजगी शिक्षण संस्था बंद करून मोफत शिक्षणाची मागणी; ठेवीदार, खाजगी रुग्णालय व पत्रकारांबाबतही ठराव

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड
महाराष्ट्र राज्य शिवराष्ट्र युवक संघटनेच्या कार्यकारणीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षण, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिपाई भरती, ठेवीदारांच्या प्रश्नांसह विविध विषयांवर चर्चा होऊन तीव्र आंदोलनाचे ठराव स्वीकारण्यात आले.

बैठकीत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याचा विषय प्रमुखतेने मांडण्यात आला. खाजगी शिक्षण संस्थांमध्ये प्रचंड लूट सुरू असल्याचे आणि गरीब कुटुंबांना डोनेशन-अॅडमिशन देणे शक्य नसल्याचे सांगितले गेले. त्यामुळे शासनाने सर्व खाजगी शिक्षण संस्था बंद करून त्यांचे सरकारी महाविद्यालये व सरकारी शिक्षण संस्थांमध्ये विलीनीकरण करावे आणि सर्वांना मोफत शिक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. गरीब मुलांनाही डॉक्टर व अभियंता होण्याची संधी मिळाली पाहिजे, असे ठासून सांगितले गेले. या मागणीसाठी शासन पातळीवर तीव्र आंदोलन करण्याचा ठराव मंजूर झाला. तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिपाई भरती करण्याची मागणीही करण्यात आली.

बेरोजगार युवक व महिलांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. महिलांना उद्योग-व्यवसाय उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे सदस्य नोंदणीचे काम ३६ जिल्ह्यांत सुरू असून प्रत्येक गावात शाखा उघडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

ठेवीदारांच्या प्रश्नावरही एकमुखी ठराव झाला. बंद पडलेल्या बँका व सहकारी पतसंस्थांमधील ठेवी संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांनी हडप केल्या असून त्यांचा उपयोग स्वतःच्या उद्योगांसाठी केला जात असल्याचे सांगितले गेले. ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने सहकार खात्याच्या दारात तीव्र आंदोलन करण्याचा आणि बंद संस्थांच्या संचालक मंडळाच्या मालमत्ता विकून व्याजासहित पैसे देण्याचा ठराव स्वीकारण्यात आला.

खाजगी रुग्णालयांमधील लूटीचा मुद्दाही मांडण्यात आला. गरज नसताना सिझेरियन व इतर ऑपरेशन्स केली जात असल्याचे, औषधांचे दर भरमसाट असल्याचे आणि यातून गोरगरिबांची लूट होत असल्याचे सांगितले गेले. खाजगी रुग्णालये व डॉक्टरांच्या मालमत्ता, ठेवी व शेअर मार्केटमधील गुंतवणुकीची आयकर व ईडीकडून चौकशी व्हावी, तसेच औषधांचे दर, गुणवत्ता व एक्सपायरी डेट फलकाने प्रदर्शित करणे बंधनकारक करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. याबाबत व्यापक आंदोलनाचा ठराव झाला.

नवी दिल्ली येथील जंतरमंतर आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. मात्र महाराष्ट्र पोलीस प्रशासन शांततामय आंदोलनात माणुसकी दाखवून सहकार्य करत असल्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.

पत्रकार व टीव्ही चॅनेल प्रतिनिधींना विशेष संरक्षण, महिन्याला ३० हजार रुपये पेन्शन तसेच विमान, रेल्वे व एसटी मोफत पास देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. शासकीय योजनांची माहिती सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याबाबतही ठराव झाला.

बैठकीला प्रदेशाध्यक्ष स्वरूप निकम, प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव सोनतळे, सरचिटणीस शोभाताई सुतार, दीपाली शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा विजया माने, जिल्हा अध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस माधुरी बावधने, कराड तालुका अध्यक्षा मंजुनाथ कांबळे, तालुका अध्यक्ष संजय कांबळे आण्णा यांसह राज्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन विजया माने यांनी केले तर आभार नितीन जाधव यांनी मानले.


➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या