हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
सातारा जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, जैवविविधतेबाबत जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने कराड येथे बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच. एस) नेचर क्लब कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
बी.एन.एच. एस ही भारतातील १४३ वर्ष जुनी निसर्ग संवर्धन व रक्षण करणारी सर्वात मोठी अशासकीय संस्था आहे.
शिक्षण मंडळ, कराड यांच्या टिळक हायस्कूल येथे झालेल्या या कार्यशाळेत सातारा जिल्ह्यातील विविध शाळांमधील ४३ शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शालेय विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यातून पर्यावरण आणि जैवविविधतेचे शिक्षण देणे, तसेच विद्यार्थ्यांना विविध निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
यावेळी श्री. राजेंद्र लाटकर, जॉईंट सेक्रेटरी, शिक्षण मंडळ, कराड आणि श्री. रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक यांनी शाळांमध्ये राबविता येणाऱ्या पर्यावरणविषयक विविध उपक्रमांबाबत आपले अनुभव व मार्गदर्शन शिक्षकांना दिले.
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आस्था निर्माण करण्यासाठी शाळांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
श्री. नंदकिशोर दुधे, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, बी.एन.एच. एस यांनी बी.एन.एच. एस नेचर क्लबच्या संपूर्ण कार्यक्रमाची रचना, शाळांमध्ये नेचर क्लब स्थापन करण्याची प्रक्रिया तसेच School Biodiversity Register (शालेय जैवविविधता नोंदवही) याचे महत्त्व आणि ती तयार करण्याची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. रोहन चव्हाण, प्रकल्प सहयोगी, बी.एन.एच. एस यांनी नेचर क्लबच्या प्रस्तावित वार्षिक उपक्रम दिनदर्शिकेची माहिती दिली. संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरीक्षण, निसर्गभ्रमंती, जैवविविधता अभ्यास, पर्यावरण जनजागृती यांसह विविध उपक्रम कशा पद्धतीने राबविता येतील, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
श्री. कुसुमाकर दामले यांनी विज्ञान पेटी (Science Kit) संदर्भात सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान पेटीचा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान शिक्षकांना विविध पुस्तकेही वितरित करण्यात आली. शाळांच्या गरजेनुसार विज्ञान पेटी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण मंडळ, कराड आणि टिळक हायस्कूल यांनी मोलाचे सहकार्य केले.
४३ शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध शाळांचा वाढता प्रतिसाद यामुळे सातारा जिल्ह्यात बी.एन.एच. एस नेचर क्लबचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी कुतूहल, आस्था आणि संवर्धनाची जबाबदारी अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
➖➖➖➖➖➖
#कराड #KaradNews #BNHS #शिक्षककार्यशाळा
#कराडतालुका #निसर्गप्रेम #टिळकहायस्कूल #चांगभलं
#चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंसाप्ताहिक #ChangbhalaNews


0 टिप्पण्या