चांगभलं प्रतिनिधी | कराड
दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी विजयनगर (ता. कराड) येथील प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालयात भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष माजी आ. आनंदराव पाटील नाना यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयांमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्तीपर सामूहिक गीते मान्यवरांसमोर व ग्रामस्थांसमोर सादर केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली, देशभक्तीपर उपक्रमांनी हा स्वातंत्र्य दिन विद्यालयामध्ये अतिशय उत्साहात पार पडला.
विद्यालयामध्ये विविध स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष माजी आ.आनंदराव पाटील नाना म्हणाले, "15 ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाच्या आत्मसन्मानाचा श्वास आहे. तिरंगा हा केवळ ध्वज नाही, तर आपल्या भारताच्या शौर्याचा, त्यागाचा आणि अस्मितेचा मानबिंदू आहे! भाषा, प्रांत, जात-पात, पक्ष आणि मतभेद यापलीकडे जाऊन आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजवणारा हा तिरंगा आहे.
आपल्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी संघर्ष केला, बलिदान दिले. सीमेवर आजही आपल्या देशाचे रक्षण करणारे जवान ऊन, वारा, पाऊस आणि जीवाची पर्वा न करता मातृभूमीची सेवा करत आहेत. त्यांच्या त्यागामुळे आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत." तसेच “विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार, शिस्त, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी. देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे,” असे प्रतिपादन आनंदराव पाटील यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमासाठी विजयनगर गावच्या सरपंच सौ. अनिता संकपाळ, उपसरपंच मा. मानसिंग दादा पाटील, वसंतराव पाटील, विश्वासराव पाटील, राजू कदम, माजी सरपंच संजय शीलवंत, दिलीपराव पाटील,डी.डी.यादव,शिवाजीराव जाधव, माधुरी शिंदे,स्नेहल शिंदे,अभिजित जाधव,रामचंद्र जाधव,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सैनिक,माजी विद्यार्थी, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विजयनगर, केसे, पाडळी,मुंढे या परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#विजयनगर #आनंदरावपाटील #स्वातंत्र्यदिन #कराड
#KaradNews #ChangbhalaNews #चांगभलं

0 टिप्पण्या