🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा साखर कारखान्यातील ही माझी शेवटची टर्म; ठसा उमटवणार, पाऊलखुणा ठेवून जाणार – डॉ. सुरेशबाबा भोसले

 

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीत; सर्व ठराव मंजूर




हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

‘या संचालक मंडळाची ही पाच वर्षे म्हणजे माझी शेवटची टर्म आहे. मी जाताना मला अपेक्षित असलेला आपल्या कारखान्याचा विस्तार आणि विकास याच पाच वर्षांत करून ठेवणार आहे. कारखाना सर्वच पातळ्यांवर अधिक सक्षम बनवून पुढील पिढ्यांसाठी महाराष्ट्रातील एक आदर्श सहकारी साखर कारखाना उभा करून जाणार आहे. त्या माध्यमातून माझा ठसा आणि पाऊलखुणा ठेवून जाणार आहे,’ असे भावनिक उद्गार यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी काढले.


शिवनगर (रेठरे बुद्रुक), ता. कराड येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १५ रोजी कारखाना कार्यस्थळावर चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या सभेला आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार भगवानराव साळुंखे, व्हा. चेअरमन जयवंत मोरे, संचालक जगदीश जगताप, लिंबाजी पाटील, दयाराम पाटील, धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, दत्तात्रय देसाई, बाजीराव थोरात, सुनील पाटील, आनंदा खबाले, संग्राम पाटील, अरविंद पाटील, सत्यजित पाटील, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी छबन कांबळे, महिला प्रतिनिधी सुजाता जाधव, सुनिता शेवाळे, इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी बाळासाहेब जगताप, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रतिनिधी अविनाश खरात, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर चारूदत्त देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.



मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. स्वागत व्हा. चेअरमन जयवंत मोरे यांनी केले, तर श्रद्धांजली ठराव संचालक लिंबाजी पाटील यांनी मांडला.
सभेत विषयपत्रिकेवरील मागील दि. २६.०९.२०२५ रोजी झालेल्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा मा. संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्वीकारणे, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे मा. संचालक मंडळाने सादर केलेले ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मंजुरी देणे, सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकातील मंजूर तरतुदीपेक्षा प्रत्यक्षात कमी-अधिक झालेल्या जमा-खर्चास मंजुरी देणे, सन २०२७-२८ या आर्थिक वर्षासाठी मा. संचालक मंडळाने सादर केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालावर मा. संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे व त्यास मंजुरी देणे, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल स्वीकारणे, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता शासनमान्य लेखापरीक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचे लेखापरीक्षण शुल्क ठरविणे, सन २०२७-२८ या आर्थिक वर्षाकरिता उपविधी क्र. ४ अन्वये वित्तीय संस्थांकडून कर्ज व भांडवल उभारणीस मंजुरी देणे, केंद्र व राज्य शासनाने सी.बी.जी., सौर ऊर्जा इ. प्रकल्पांसाठी नव्याने जाहीर केलेल्या प्रोत्साहनात्मक (सबसिडी) धोरणांची माहिती घेऊन सदर प्रकल्प उभारणीबाबत धोरण स्वीकारणे, कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकता वाढ, सिंचन व्यवस्था सक्षमीकरण व क्षारपड जमीन सुधारणा धोरण स्वीकारण्याबाबत निर्णय घेणे तसेच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील निरुपयोगी स्क्रॅप विक्रीस कार्योत्तर मंजुरी देणे, हे सर्व विषय मंजूर करण्यात आले.
अध्यक्षांच्या परवानगीने सभेपुढे ऐनवेळी आलेल्या विषयांमध्ये संपतराव राजाराम थोरात (कार्वे) यांनी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांना जागतिक स्तरावरील पुरस्कार तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावाला माणिकराव जाधव (दुशेरे) यांनी अनुमोदन दिले.
सुचक संजय पाटील यांनी सहकार पॅनेलच्या विजयाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला बाजीराव शेटे (येळगाव) यांनी अनुमोदन दिले.
व्हा. चेअरमन जे. डी. मोरे यांच्या हस्ते डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सत्कार जगदीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर चारूदत्त देशपांडे यांचा सत्कार डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. टेक्निकलचे जनरल मॅनेजर बालाजी पबसेटवार, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील यांचाही डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीपतराव हिवरे यांच्याकडून वेलदोड्यांचा हार घालून डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

      कृष्णाचा पुढील पाच वर्षाचा अजेंडा....


कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सभेत बोलताना कृष्णा कारखान्याचा पुढील पाच वर्षांचा अजेंडा सभासदांसमोर ठेवला. आधुनिकीकरण आणि शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानातील बदल स्वीकारून डिस्टलरीचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, कंटिन्यू फर्मेंटेशन व मल्टी प्रेशर टेक्नॉलॉजीमुळे मोलॅसिसपासून अल्कोहोलचे उत्पादन वाढले आहे. सन २००० मध्येच इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेणाऱ्या कारखान्याने आता १ लाख ५८ हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प उभारला आहे.
उसापासून साखर, अल्कोहोल, इथेनॉल, डाउनस्ट्रीम केमिकल्स, बायोगॅस, सीबीजी आणि कंपोस्ट तयार करून ‘सॉईल टू सॉईल’ संकल्पना राबविण्याचा प्रयत्न आहे. सध्या १६ ते १८ मेगावॅट वीज निर्मिती होत असून, ४० मेगावॅट क्षमतेपर्यंत वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
कमी खर्चात पाच वर्षांत गुंतवणूक परत मिळवून देणारे प्रकल्प उभारण्यावर भर राहील. सीबीजी, को-जनरेशन, कंट्री लिकर, एमएमएफएल, डाउनस्ट्रीम केमिकल्स आणि बायोफर्टिलायझर प्रकल्पांचा विस्तार केला जाईल. साखरेचे विविध मूल्यवर्धित प्रकार, आधुनिक पॅकिंग आणि उत्पादन विक्री वाढविण्यावरही लक्ष दिले जाईल.
कारखान्याची क्रशिंग क्षमता १२ हजार टनांवरून १३ ते १४ हजार टन प्रतिदिनपर्यंत स्थिर करण्याचा प्रयत्न केला जाईल. कामगारांचे वर्षभर व्यवस्थापन, त्यांच्या प्रगतीचा विचार आणि कारखान्याच्या कार्यक्षमतेत वाढ हेही महत्त्वाचे उद्दिष्ट राहणार आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी राख नियंत्रण, फिल्टर, मल्टी इफेक्ट इव्हॅपोरेटर, बायोकंपोस्टिंग आणि स्पेंट वॉशपासून सीबीजी निर्मिती केली जात आहे. भविष्यात स्पेंट वॉशचा एक थेंबही बाहेर जाणार नाही, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
बायोफर्टिलायझर लॅबचा विस्तार करून सभासदांना कमी दरात खत उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त उत्पादन बाजारात विकणे अपेक्षित आहे. जुन्या सिंचन योजनांचे तांत्रिक ऑडिट करून शासनाच्या मदतीने त्यांचे सक्षमीकरण केले जाईल. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक आणि वेळेवर पाणी मिळेल.
ड्रेनेज, क्षारपड जमीन सुधारणा, पानंद रस्ते आणि रेल्वेचे अनेक गेट बंद झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या ऊस वाहतूक समस्यांवरही काम केले जाईल. कारखाना परिसरातील जुनी कामगार कॉलनी, अंतर्गत रस्ते, केन डेव्हलपमेंट आणि गोडाऊन यांचे आधुनिकीकरण केले जाईल. सुमारे पाच लाख क्विंटल क्षमतेचे आधुनिक गोडाऊन उभारण्याचा प्रस्ताव आहे.
साखरेचे दर, आयात, तोडणी-वाहतूक खर्च, डिझेल, सल्फर आणि पीपी बॅगच्या वाढत्या किमती यामुळे उद्योगासमोर आव्हाने आहेत. तरीही कृष्णा कारखाना शेतकऱ्यांना योग्य दर देण्याची परंपरा कायम ठेवेल. पुढील पाच वर्षांत विस्तारीकरण, आधुनिकीकरण आणि मूल्यवर्धित प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक मोबदला देणे हा मुख्य उद्देश राहणार असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी स्पष्ट केले.


शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृष्णा कारखान्याने नेहमीच अग्रेसर राहावे - आमदार डॉ. अतुलबाबा भोसले 


आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, सन २०१५ मध्ये प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत डॉ. सुरेशबाबा भोसले आणि संचालक मंडळाने कृष्णा कारखान्याची धुरा स्वीकारली. त्या काळात तोडणी-वाहतुकीसाठी निधी देण्यास बँका तयार नसताना कृष्णा सहकारी बँकेने पुढाकार घेतला.
त्यानंतरच्या काळात कारखान्याने विविध बँकांचे सुमारे २७९ कोटी रुपयांचे कर्ज फेडले. २०१५ मधील ७ हजार २०० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता आता १२ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून, विस्तार करताना सभासदांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले.
डिस्टलरीची क्षमता १ लाख १५ हजार लिटर प्रतिदिन करण्यात आली असून, दुसऱ्या डिस्टलरीची क्षमता वाढवून एकूण क्षमता सुमारे दीड लाख लिटर प्रतिदिन करण्याचे नियोजन आहे. कारखान्याने १४ लाख १९ हजार टन गाळप आणि १६ लाख ९३ हजार साखर पोत्यांचे उत्पादन करून ७० वर्षांच्या इतिहासातील विक्रम नोंदविला आहे. ताळेबंदावर १८ कोटी ६७ लाख रुपयांचा संचित नफा असून, दीर्घ मुदतीचे कर्ज सुमारे २४३ कोटी रुपये आहे.
कारखान्याने विस्तारासोबत पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावरही भर दिला असून, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर, बेल्ट स्क्रबर आणि सल्फर रिमूव्हिंग सिस्टीम यांसारख्या उपाययोजना केल्या आहेत. मल्टी इफेक्ट इव्हॅपोरेटरच्या माध्यमातून प्रक्रिया अवशेषांचा वापर कंपोस्ट निर्मितीसाठी केला जात असून, सुमारे २५ हजार टन लूज कंपोस्ट सभासदांना वितरित करण्यात आले आहे.
भविष्यात साखर कारखाने साखरेसोबत इथेनॉल, वीज, सीबीजी आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करणारे केंद्र बनतील. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाला केंद्राची परवानगी असून, त्यातून उसाचे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सभासदांना प्रतिवर्षी ६० किलो साखर देण्याचे धोरण २०१५ पासून कायम आहे.
उच्च रिकव्हरीमध्ये कृष्णा कारखान्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याचे सांगून, सहकाराच्या माध्यमातून कारखाना आदर्श वाटचाल कायम ठेवेल, असा विश्वास आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला.
सिंचन योजनांच्या आधुनिकीकरणासाठी एआयबीपी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जुन्या योजनांचा देखभाल, दुरुस्ती, मनुष्यबळ आणि वीज खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षम पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जाणार आहे.
कराड परिसरातील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सुसज्ज तालमीच्या माध्यमातून कराडला महाराष्ट्रातील कुस्तीचे केंद्र बनविण्याचा मानस आहे. महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यांमध्ये शेतीसाठीच्या ‘महाविस्तार’ उपक्रमाचा सर्वाधिक वापर कराड तालुक्यात झाल्याचे त्यांनी सांगितले.
कृष्णा कारखान्याने महाविस्तारअंतर्गत ट्रायल प्लॉट हाती घ्यावेत, तसेच शेतकरी गटांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसह विविध संस्थांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
साखरेसोबत इथेनॉल, को-जनरेशन, सीबीजी आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर भर देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. आर्थिक शिस्त, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरीहित यांचा समन्वय साधत कृष्णा कारखान्याने आदर्श वाटचाल कायम ठेवावी, यासाठी संचालक मंडळाला पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

ज्येष्ठ संचालक धोंडीराम जाधव यांनी आभार मानले, रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. सभेला मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पै. धनंजय पाटील, ब्रह्मानंद पाटील, गोविंद गावडे, राहुल पाटील, बबनराव सावंत, सुहास जगताप, शिवाजी पवार, महादेव पवार, शशिकांत पाटील, संपतराव थोरात, गजेंद्र पाटील, अतुल शिंदे, माजी आमदार आनंदराव पाटील, दीपक पाटील, संभाजीराव निकम, वैभव थोरात, माणिकराव जाधव, गणेश शेवाळे, हर्षवर्धन मोहिते, पैलवान आनंदराव मोहिते आदींसह कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.





आता शेवटची टर्म... माझ्याही पाऊलखुणा ठेवून जाणार...


कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी नव्या संचालक मंडळाच्या पहिल्याच वार्षिक सर्वसाधारण सभेत थेटच ही आपली शेवटची टर्म असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘माझी ही शेवटची टर्म. त्यामुळे मला जे काही करायचे आहे ते या पाच वर्षांतच करून ठेवणार. कारखान्यावर माझ्या कामाचा ठसा उमटवून ठेवणार आहे. पाऊलखुणा ठेवून जाणार आहे. कारखान्याच्या सभासदांना यापुढे चार पैसे जास्त मिळत राहावेत आणि हा कारखाना नेहमीच महाराष्ट्रात आदर्शवत राहावा, पुढच्या पिढ्यांना आदर्श वाटावा, असे काम येणाऱ्या पाच वर्षांत करण्याचा माझा संकल्प आहे. आणि सभासदांच्या सहकार्यावर मी व माझे संचालक मंडळ हे नक्कीच करणार आहे.’


➖➖➖➖➖

#कृष्णासाखरकारखाना #कृष्णाकारखानावार्षिकसभा2026 #सुरेशभोसले #अतुलबाबाभोसले #रेठरेबुद्रुक #सहकार #चांगभलं #चांगभलंन्यूजपेपर #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या