🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कोयना बँकेची ३० वर्षांची विश्वासाची शिदोरी; आता आधुनिक बँकिंगसह विस्ताराला गती

 Forex, CGTMSE, PMFME व मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या माध्यमातून ग्राहक, शेतकरी व उद्योजकांना सक्षम करण्याचा संकल्प




चांगभलं प्रतिनिधी | कराड


तीन दशकांच्या विश्वासपूर्ण वाटचालीत सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्या विश्वासाची भक्कम शिदोरी घेऊन कोयना सहकारी बँक लि., कराड आता आधुनिक बँकिंग, व्यवसायवृद्धी आणि शाखा विस्ताराच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे. बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन के. टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. बँकेने ₹२०० कोटींपेक्षा अधिक ठेवींचा टप्पा पार केल्याबद्दल सभेत समाधान व्यक्त करण्यात आले.

सभेच्या प्रारंभी लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्याची बँकेची भूमिका असून, बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार ग्राहकसेवा आणि गुणवत्तापूर्ण कर्जवाटप यावर आगामी काळात अधिक भर देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

बँकेच्या पुढील वाटचालीत Forex, CGTMSE, PMFME तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबविण्यात येणार आहेत. परदेशी शिक्षण, व्यवसाय व अनुमत व्यवहारांसाठी Forex सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच पात्र सूक्ष्म व लघु उद्योजकांना CGTMSEच्या माध्यमातून वित्तपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतमालावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करून ग्रामीण भागात उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी PMFME योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यात येणार आहे. तसेच दुग्ध व्यवसाय, पशुपालन आणि कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेशी पात्र लाभार्थ्यांना जोडून आर्थिक सहकार्य करण्याचा बँकेचा मानस आहे.

बँकेचे संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आगामी काळात बँकेच्या आधुनिक बँकिंग सेवांबरोबरच प्रभावी मार्केटिंग, CASA ठेवींमध्ये वाढ आणि स्पर्धात्मक वातावरणात गुणात्मक प्रगती करण्याची गरज व्यक्त केली. नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचणे, विद्यमान ग्राहकांशी अधिक दृढ संबंध निर्माण करणे आणि ठेवींची गुणवत्तापूर्ण वाढ करण्यासाठी शाखानिहाय नियोजन व प्रभावी मार्केटिंग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांना जलद, पारदर्शक व विश्वासार्ह सेवा देतानाच आर्थिक शिस्त, सक्षम वसुली आणि गुणवत्तापूर्ण कर्जवाटप यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचेही अॅड. उदयसिंह पाटील यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे बँकेच्या वाटचालीला दिशा मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बँकेच्या सध्या १२ शाखा कार्यरत असून कराड येथील विद्यानगरमध्ये नवीन शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेची मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्यांपासून व्यापारी, नोकरदार, महिला, उद्योजक व सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत आधुनिक बँकिंग सेवा पोहोचविण्यास या शाखेची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. भविष्यात मुंबईमध्येही शाखा सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

युवा नेते आदिराज पाटील यांनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या प्रगतीस शुभेच्छा दिल्या. नव्या पिढीच्या अपेक्षा, आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या आर्थिक संधी लक्षात घेऊन बँकेने अधिक वेगाने पुढे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सभेपुढील विषयांचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जे. व्ही. माने यांनी केले. सभेपुढील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. श्रद्धांजलीचा ठराव संचालक तुकाराम डूबल यांनी मांडला. सभासदांसाठी आयटी तज्ज्ञ सुनील बोटलवार व बँकिंग तज्ज्ञ प्रताप चव्हाण यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यावेळी सभासदांच्या पाल्यांना पाल्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिनकर रामिष्ठे यांनी केले. तीन दशकांचा विश्वास, आधुनिकतेची साथ आणि विस्ताराची नवी दिशा या बळावर कोयना सहकारी बँकेला अधिक सक्षम, शिस्तबद्ध व आदर्श सहकारी बँक बनविण्याचा निर्धार उपाध्यक्ष साहेबराव शेवाळे यांनी सभेत व्यक्त करून सभेचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.


➖➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या