चांगभलं प्रतिनिधी | कराड
कर्तव्याची कठोरता आणि माणुसकीची ऊब यांचा सुंदर समतोल साधत पोलीस सेवेत कार्यरत असलेले कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय दराडे यांना नुकतेच गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून त्यांच्या दीर्घकालीन नि:स्वार्थ सेवेची दखल घेऊन अतिउत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कापील ग्रामस्थ व ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळेस त्यांना संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींची आसनस्थ मूर्ती, उपरणे व बुके देऊन गौरवांकित करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला,मंडळाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक,पोलीस मित्र उपस्थित होते.
पोलीस सेवेत कर्तव्य बजावताना कायदा-सुव्यवस्था राखणे, सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेणे आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे या जबाबदाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. या जबाबदाऱ्या पार पाडताना श्री. दराडे यांनी दाखविलेल्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव म्हणून हा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवेला मिळालेला हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान कापील ग्रामस्थांसाठीही अभिमानाचा विषय ठरला.
ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम केवळ औपचारिक सत्कार नव्हता, तर समाजाच्या वतीने एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्याला दिलेली मनापासूनची पावती होती. समाजासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणे ही समाजाचीही जबाबदारी आहे. त्याच भावनेतून हा सत्कार आयोजित करण्यात आल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
“कापील ही संतांची आणि शूरवीरांची भूमी”
सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय दराडे यांनी कापील गावाविषयीचा आपला जिव्हाळा व्यक्त केला. “कापील ही संतांची आणि शूरवीरांची भूमी असून वारकरी संप्रदायातील समृद्ध परंपरा जपणारे कराड तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे,” असे त्यांनी नमूद केले. गावच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचा गौरव करत त्यांनी ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.संतपरंपरा, वारकरी विचारधारा आणि सामाजिक एकोपा जपणाऱ्या गावाकडून मिळालेला सन्मान हा आपल्यासाठी विशेष असल्याची भावना त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाली.
या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी श्री. दत्तात्रय दराडे यांना अतिउत्कृष्ट सेवा पदकाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी सदिच्छा व्यक्त करताना कराड शहरासह समाजाच्या सुरक्षिततेसाठी, कायदा-सुव्यवस्थेसाठी आणि सामान्य नागरिकांच्या हितासाठी त्यांच्या हातून यापुढेही उल्लेखनीय कार्य घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
➖➖➖➖➖➖
#कराड #पोलीस #दत्तात्रयदराडे #कापील #पोलीससन्मान #चांगभलं #चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर

0 टिप्पण्या