टेंभू, ताकारी, म्हैसाळ प्रकल्पांतील कामांसाठी सिंचन भवन येथे ठिय्या आंदोलन; स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर
चांगभलं प्रतिनिधी | कराड
पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळ सिंचन भवन
सांगली पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या टेंभू, ताकारी व म्हैसाळ प्रकल्पांतील यांत्रिकी व विद्युत देखभाल, दुरुस्ती आणि परिचलनाची कामे स्थानिक ठेकेदार व भूमिपुत्रांना उपलब्ध करून द्यावीत, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष तसेच बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे येथील सिंचन भवन, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
प्रकल्पांसाठी होणाऱ्या कामांमध्ये स्थानिक छोटे ठेकेदार, शेतकरी भूमिपुत्र आणि स्थानिक कामगारांना डावलून मोठ्या ठेकेदारांना कामे दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. “बाहेरच्या ठेकेदारांना कामे देण्यापेक्षा प्रकल्प परिसरातील स्थानिक ठेकेदारांना संधी द्या आणि स्थानिक कामगारांच्या हाताला काम द्या,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.
टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ हे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित आहेत. या प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामातून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. स्थानिक ठेकेदारांकडे कामे आल्यास त्यातून परिसरातील कामगारांनाही रोजगार मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन स्थानिक शेतकरी भूमिपुत्र, छोटे ठेकेदार आणि कामगारांना कामाची संधी देण्यासाठी पारदर्शक व न्याय्य प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक आंदोलनाची दखल घ्यावी
या आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश शेवाळे, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, जिल्हा कार्याध्यक्ष महेश जिरंगे, सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र बाळू कुंभार यांच्यासह विविध पदाधिकारी, शेतकरी, स्थानिक ठेकेदार, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
➖➖➖➖➖➖

0 टिप्पण्या