🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा हॉस्पिटलमध्ये दोन युवकांवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण

 'कृष्णा'मध्ये किडनी प्रत्यारोपणाचे अर्धशतक पूर्ण




चांगभलं प्रतिनिधी | कराड

खटाव तालुक्यातील एका शेतकरी युवकाला त्याच्या वडिलांनी आणि पाटण तालुक्यातील तरुणाला त्याच्या आईने किडनी दान करून, माणुसकी आणि वात्सल्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या दोन्ही युवकांवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. या शस्त्रक्रियेमुळे कृष्णा हॉस्पिटलच्या यशस्वी किडनी प्रत्यारोपणांची संख्या ५० वर पोहोचली असून, कृष्णा हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाचे ‘अर्धशतक’ पूर्ण झाले आहे. यशस्वी उपचारानंतर दोन्ही रुग्ण आणि किडनी दाते यांची प्रकृती उत्तम असून, त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

खटाव तालुक्यातील ३५ वर्षीय प्रताप (नाव बदलले आहे) हे शेतकरी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्यांना किडनीच्या आजाराचा त्रास होता. आजाराची तीव्रता वाढल्याने त्यांना नियमित डायलेसिसवर अवलंबून राहावे लागत होते. कृष्णा हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून डायलेसिस उपचार सुरू होते. अखेर वैद्यकीय सल्ल्यानुसार किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. मुलाला नवजीवन मिळावे यासाठी त्यांच्या शेतकरी वडिलांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

पाटण तालुक्यातील ३१ वर्षीय संग्राम (नाव बदलले आहे) यांनी आयटीआयचे शिक्षण घेतले असून, ते एका खासगी संस्थेत नोकरी करतात. गेल्या वर्षभरापासून त्यांना किडनीच्या आजाराचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांनाही किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. वडिलांचे निधन झालेले असल्याने त्यांच्या आईने मुलाला किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

दोन्ही कुटुंबांनी कृष्णा हॉस्पिटलच्या किडनी ट्रान्सप्लान्ट विभागाशी संपर्क साधला. विभागाच्या समुपदेशक वैशाली यादव यांनी किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया, उपचारपद्धती, दाता व रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय तपासण्या आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी याबाबत कुटुंबीयांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे यांच्या निर्देशानुसार या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. किडनी ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. भूषण पाटील, युरॉलॉजिस्ट डॉ. अनिल हुद्देदार, डॉ. योगेश जाधव, डॉ. अभिजीत काटकर, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. राहुल पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. आदित्य खोत यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने आणि अन्य सहकाऱ्यांनी या उपचार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

दोन्ही रुग्णांवर यशस्वीपणे किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच ‘लॅपरोस्कोपिक टोटल नेफ्रेक्टॉमी’ या अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णांची शस्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी अधिक सुलभ झाली. चारही जणांची प्रकृती उत्तम असून, वैद्यकीय निरीक्षणानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी रुग्णांची व किडनी दात्यांची विचारपूस करुन, त्यांना निरोगी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, नर्सिंग डायरेक्टर रोहिणी बाबर, समुपदेशक वैशाली यादव यांच्यासह हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते.

किडनी प्रत्यारोपणात कृष्णा हॉस्पिटलचे ‘अर्धशतक’!

कृष्णा हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यांच्या माध्यमातून आतापर्यंत ५० किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमधील रुग्णांसाठी किडनी प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कृष्णा हॉस्पिटल हे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे.


➖➖➖➖➖➖➖

#कृष्णाहॉस्पिटल #कराड #किडनीप्रत्यारोपण #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या