कराड , दि. २७ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ५ मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. कराड शहराला गेल्या अनेक वर्षांपासून ठेकेदारशाहीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे प्रतिपादन चव्हाण यांनी केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रथमच कराड नगरपालिकेत हाताच्या चिन्हावर थेट निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी काँग्रेसने स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुकांत सहभाग घेतला होता.
प्रभाग क्र. ५ मधील काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील या यापूर्वी नगराध्यक्षा राहिलेल्या लोकप्रिय नेत्या असून, विकासकामांचा ठसा उमटविणाऱ्या अनुभवी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यासोबत पक्षाने तरुण, तडफदार आणि कार्यक्षम योगेश लादे यांच्यावरही विश्वास दाखवीत या प्रभागात दुहेरी ताकद उतरविली आहे. “अनुभव आणि युवकशक्तीचा संगम काँग्रेसला निर्णायक यश मिळवून देईल,” असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
सभेत बोलताना चव्हाण म्हणाले,
“कराड शहराने ठेकेदारशाही व स्वार्थी राजकारणाला धडा शिकविण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वधर्म समभावाची भावना दृढ करण्यासाठी, तसेच कराडला पुन्हा विकासमार्गावर आणण्यासाठी काँग्रेसलाच संधी द्या. विशेषतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, हेच कराडच्या विकासाचे पाऊल ठरेल.”
या कार्यक्रमास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष अमित जाधव, आसामहून आलेले निरीक्षक इकबाल अहमद, उमेदवार अर्चनाताई पाटील, योगेश लादे, आनंदराव लादे, प्रदीप जाधव, इंद्रजीत चव्हाण, सौ. मारुलकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या शेवटी सर्वांनी काँग्रेसच्या हाताच्या चिन्हाला मतदान करून कराड शहराला ठेकेदारांच्या सावटातून मुक्त करण्याचा, तसेच शांतता व सदभावनेचे वातावरण निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रभावी सभेमुळे प्रभाग क्र. ५ मधील काँग्रेसच्या प्रचाराला लक्षणीय गती मिळाल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्टपणे जाणवू लागले आहे.
#KaradElection2025 #KaradNagarapalika #PrithvirajChavan #CongressKarad #Prabhag5 #ZakirPathan #ArchanaPatil #YogeshLade #ChangbhalaNews #KaradPolitics


0 टिप्पण्या