कौशल्य प्रशिक्षणातून महिला उद्योजिका घडविण्यासाठी योगदान देणाऱ्या, अनेक सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्ञानदीप सामाजिक संस्थेच्या संचालिका सौ.मधुराणी आनंदा थोरात (वय 43) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सेवा कार्याचा थोडक्यात आढावा.....
मधुराणी थोरात यांच्या सेवाकार्याची अनोखी ओळख निर्माण झाली होती. एकल महिला संघटन, महिलांचा संपत्ती अधिकार, महिला नेतृत्व विकास, लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन आणि संविधान जागृती अशा विविध चळवळीत अग्रणी होत्या. महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी सतत लढणाऱ्या होत्या. तसेच ज्ञानदीप कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या म्हणून त्या सेवा कार्य करत होत्या. कौशल्य विकास प्रशिक्षणातून महिलांना उद्योजक बनविण्यासाठी त्यांनी कार्य केले होते. अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. विविध गावांतील गरजूंना विशेषतः वंचित घटकांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी त्यांचा पुढाकार होता.
कराड तालुक्यातील ओंड सारख्या गावातून फक्त महिलांच्या सक्षमीकरता बाहेर पडून त्यांना भक्कम पाठिंबा व आधार देण्याचे काम मधुराणी आनंदा थोरात करत आहेत. त्यांची ही चळवळ आता गावोगावी वाढत चालली आहे. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटूंब सुशिक्षित बनते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व स्तरातील स्त्रियांना खंबीर बनविण्याचे त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे.......
ओंड, ता. कराड सारख्या ग्रामीण भागातून कार्याला सुरुवात केलेल्या (२००४) ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंदा बाबुराव थोरात यांनी संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील सामान्य लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा आणि सेवांसाठी सक्षम बनवून ग्रामीण भागाचा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी विकास करण्याचे ध्येय ठेवले. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सौ.मधुराणी आनंदा थोरात यांनी ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून 2009 सालापासून आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, पर्यावरण व महिला बालकल्याण आणि कौशल्य विकास क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले. कराडमधील ज्ञानदीप कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून शहरासह चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातर्गंत गावापासून-वाडीवस्तीपर्यंत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देवून अनेकांना विशेषत: महिलांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले.
राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी कायदे व हक्कविषयक आणि विशेषत: डिजिटल साक्षरता प्रशिक्षण व कार्यशाळा घेतली आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्गंत राष्ट्रीय जनसहयोग एवं बालविकास संस्थानच्या (निपसीड) असुरक्षित महिलांसाठी समुपदेशन विषयी कार्यशाळेत मिळालेल्या ज्ञानाद्वारे असुरक्षीत महिलांसाठी समुपदेशन करण्याचे काम त्यांनी केले. चौदाव्या वित्त आयोगाच्या कामात यशदाच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणून ग्रामविकास आराखडा निर्मितीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावस्तरावरील कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्र, सातारा यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांत सहभागी होण्याबरोबरच कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणूनही योगदान दिले. नेहरु युवा केंद्राच्या विविध उपक्रमांत त्यांनी सहभाग नोंदविला आहे. सनबीम व ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी डिजिटल साक्षरता कार्यशाळा यशस्वीपणे घेतल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती योजना अभियान (कराड तालुका पंचायत समिती) येथे समूह साधनव्यक्ती (बीआरपी) म्हणून कार्य करताना महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी योगदान दिले. कराड पंचायत समिती स्तरावर महिला तक्रार निवारण समिती सदस्या म्हणून त्या कार्यरत होत्या. सामाजिक अंकेक्षण अंतर्गंत रोजगार हमी योजनेचे कराड तालुकास्तरावर सीआरपी म्हणून कार्यरत असताना रोजगार हमी योजनेच्या कामांची तपासणी करुन रोहयोचे महत्व आणि जॉबकार्ड धारकांचे हक्कांविषयी जागृती केली आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाहभत्ता योजनेंतर्गत सुरु असलेल्या कराड येथील यशवंतराव चव्हाण मुलींच्या वसतिगृहात व मिरज येथील मुलींच्या वसतिगृहात, तसेच अल्पसंख्याक मुलींसाठी पुणे येथील वसतिगृहात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी योगदान दिले.
कोरो इंडिया, मुंबई यांच्या माध्यमातून एकल महिलांचे संघटन उभारण्यासाठी त्यांनी कापिल, गोळेश्वरसह कराड तालुक्यात चळवळ उभारण्यास प्रारंभ केला आहे. समाजात आजही अनाथ, परितक्त्या, विधवा महिलांना मानाचे स्थान मिळत नाहीत. कोणत्याही शुभ उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. त्यांच्यावर ओढावलेल्या या संकटामध्ये त्यांचा काहीच दोष नसतो. हे माहित असतानाही त्यांना अनेक गोष्टींपासून लांब ठेवले जाते. प्रत्येक गावात अशा महिलांची संख्या मोठी आहे. त्यांचे संघटन करून त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मधुराणी थोरात यांनी पुढाकार घेतला. एकल महिलांचे संघटन करण्यास या संस्थेस मोठे यश आले आहे. प्रत्येक गावात असे संघटन उभे करण्याचा मानस करून त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न केला. एकल महिलांना एकसंघ करुन त्यांचा बचतगट उभारणीसह त्यांच्या आरोग्य, शिक्षण व उपजिविका याकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकत्यांकरिता नेतृत्वविकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवित आहेत. तसेच महिला व बालविकास विभागाच्यावतीने कराड येथील आशाकिरण महिलांचे शासकीय वसतिगृहात समुपदेशन करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली होती. भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्राच्या उपक्रमांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मधुराणी थोरात यांनी समाजातील महिलांसाठी उचलले पाऊल खरोखरच कौतुकास्पद व सर्व महिलांना अभिमानास्पद होते. सर्वच स्तरातील महिलांना बळकटी देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा त्यांचा मानस पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले. महिलांचा संपत्तीवरील अधिकार चळवळीचे काम त्यांनी सातारा जिल्ह्यात प्रभावीपणे केले. यामध्ये महिलांना संपत्तीचा अधिकार समजून सांगण्यासह संपत्ती म्हणजे काय, 8 अ चा उतारा, सातबारा उतारा कसा वाचायचा यांसह शासनाच्या संयुक्तघर मालकी हक्क, लक्ष्मीमुक्ती योजना याची माहिती तळागाळातील महिलांना देण्यासह विवाह नोंदणी किती महत्वाचे आहे. यासाठी त्यांनी सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा घेतल्या.
संविधान जागृती अभियानातून मुलींच्या वसतिगृहामध्ये समता क्लब स्थापन करून, त्या माध्यमातून संविधानिक मूल्ये यांबाबत जागृती करण्याचे काम केले. वस्ती पातळीवर आणि विविध समुदायांमध्ये जाऊन संविधानाविषयी जागृती करण्याचे काम आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी अनेक कार्यक्रम, व्याख्याने, कार्यशाळा, खेळ, गाणी आदींच्या माध्यमातून त्यांनी काम केले. ,हर घर तिरंगा, हर घर संविधान, हा अनोखा उपक्रम त्यांनी राबविला. लोकशाहीमध्ये मतदारराजाचे महत्व पटवून देत मतदार जागृतीचेही काम त्यांनी प्रभावीपणे केले.
सेंद्रिय परसबाग निर्मितीसाठी 25 गावांमध्ये महिला बचत गट, शाळा, अंगणवाडी यांच्यासोबत कार्य, कुपोषण निर्मूलनासह विषमुक्त अन्न निर्मितीसाठी सेंद्रिय परसबाग निर्मिती कार्यक्रम राबवणे, रक्तक्षय मुक्त भारत निर्मितीसाठी कार्य, किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व पोषण आहाराबाबत जागृती करणे, कोरो इंडिया (मुंबई) या संस्थेच्या सहकार्याने संविधान साक्षरता अभियान राबवणे, कोविड काळात कोविड केअर सेंटरची उभारणी, महिला बचत गटांना मोफत मास्क निर्मिती प्रशिक्षण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेला मास्क देणे, महिलांसाठी कायदे व हक्क व्यवस्थित कार्यशाळा व डिजिटल साक्षर कार्यशाळा बालग्राम संरक्षण कमिटी सदस्यांना प्रशिक्षण पंचायतराज व्यवस्था सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण देण्याचे कामात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. संस्थेच्या व त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेला व त्यांना अनेक शासनाच्या पुरस्कारांसह इतर संस्थांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
संत नामदेव महाराजांनी ''नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी...'' या अभंगातून भागवत सांप्रदायास संपूर्ण समाजाला मोठी शिकवण दिली. त्यानुसार 'जगी ज्ञानदीप' लावण्यासाठी, तसेच परिवर्तन घडवण्यासाठी शिक्षणासह आरोग्य, पर्यावरण, जलसाक्षरता, कृषी, उपजीविका, ग्रामीण विकास, क्रीडा व सामाजिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ‘मधुराणी थोरात’ यांनी समाज विकासात व परिवर्तनात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या याच कार्यामुळे संस्थेने आज महाराष्ट्र राज्यासह राष्ट्रीय पातळीपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करत नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या पश्चात त्यांनी दिलेला विचार, चालवलेली चळवळ आणि समाज परिवर्तनाच्या वाटेवर चालत सेवा कार्य करणे, हीच त्यांना खरी आदरांजली !🙏🏻
- 'चांगभलं न्यूज' समुहाकडून सौ. मधुराणी थोरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏🏻
🔹 ज्ञानदीप कौशल्य विकास केंद्र
🔹 कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण
🔹 एकल महिलांचे संघटन व मार्गदर्शन
🔹 महिलांचा संपत्तीवरील अधिकार याबाबत जनजागृती
🔹 संविधान जाणीव जागृती कार्यक्रम
🔹 न्याय व हक्कांसाठी सातत्यपूर्ण योगदान
🔹 विशाखा समितीची प्रभावी अंमलबजावणी
🔹 महिलांच्या शिक्षण व आरोग्यासाठी प्रयत्नशील
🔹 किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर मेळावे
🔹 कराड पंचायत समिती स्तरावर महिला तक्रार निवारण समिती सदस्य म्हणून कार्य
🔹 रोजगार हमी योजनेचे कराड तालुका स्तरावर सीआरपी म्हणून कार्य
🔹 ग्रामविकास आराखडाविषयी प्रविण प्रशिक्षक म्हणून कार्य
🔹 आशाकिरण महिला वसतीगृहात समुपदेशक म्हणून कार्य
🔹 लोकसहभागातून पाणी चळवळ राबविणे
🔹 बालविवाह मुक्त भारत अभियान
🔹 किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन
🔹 कोरोना काळात मोलाची मदत व सामाजिक कार्य
🔹 सावित्री अभियान
🔹 महिला समुपदेशन केंद्राची उभारणी व कार्य
🔹 डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळा







0 टिप्पण्या