कराड | चांगभलं वृत्तसेवा | दि. ७ नोव्हेंबर २०२५
ऊसाला प्रती टन चार हजार रुपये दर मिळावा आणि पहिला हप्ता ३७५० रुपये मिळावा, या मागणीसाठी आज दुपारी तांबवे फाटा (साकुर्डी), तालुका कराड येथे शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार संघटना आणि इतर शेतकरी संघटनांनी संयुक्तपणे रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. तब्बल अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी जवळपास दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शेकाप जिल्हाध्यक्ष अॅड. भाई समीर देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“गेल्या दहा वर्षांपासून ऊसाला योग्य दर मिळालेला नाही. एफआरपी धोरणात बदल झाला पाहिजे. जीवनावश्यक वस्तू कायद्यातून साखर वगळली पाहिजे. साखरेचे १७ टक्के उत्पादन घरगुती वापरासाठी जाते, तर ८३ टक्के औद्योगिक वापरासाठी. सरकारने औद्योगिक वापरासाठी साखरेचा दर ७० रुपये किलो ठेवावा आणि घरगुती उपभोक्त्यांसाठी २५ रुपये किलो ठेवला, तरी ऊसाला ५००० रुपये दर देता येईल.”
बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव म्हणाले,
“साखरेला ४००० रुपये दर मिळावा ही आमची ठाम मागणी आहे. मागील वर्षी ठरल्याप्रमाणे दोनशे रुपये अतिरिक्त दर कारखानदारांनी द्यावेत. आजच्या आंदोलनामुळे कारखानदार घाबरले आहेत — दोन तासात एकही उसाचा ट्रॅक्टर या रस्त्याने गेलेला नाही. शेतकऱ्यांनी एकी दाखवली, तर ४००० दर मिळवून दाखवू.”
👇 बातमीचा व्हिडिओ चांगभलं न्यूज youtube चॅनलवर पहा..
या आंदोलनात भाई अरुण डुबल, भाई हैबतराव पवार, भाई सावंत, भाई संभाजीराव जाधव, मनोज हुबाळे, डॉक्टर देशमुख, तसेच शेकाप, बळीराजा शेतकरी संघटना व रासपचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रासपचे कार्याध्यक्ष महेश जिरंगे यांनी सर्वांचे आभार मानले.
या यशस्वी रास्ता रोको आंदोलनाने ऊसदराच्या प्रश्नाला नव्याने धार मिळाली आहे.
#ChangbhalaNews #KaradNews #SataraNews #TambaveFata #Usadar #ShetkariAndolan #Shekap #BalirajaShetkariSanghatana #RSP #PrharSanghatana #KaradPolitics #ShetkariEkata #UsaAndolan #FarmersVoice #UsaRate4000



0 टिप्पण्या