मुख्यमंत्री समृद्ध ग्रामअभियानाअंतर्गत उपक्रम ; ग्रामस्वच्छते बरोबरच बांधला वनराई बंधारा
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कराड तालुक्यातील (जि. सातारा) बेलवडे बुद्रुक गावात ग्रामस्थांनी लोकसहभागातून ग्राम स्वच्छता अभियान राबवून श्रमदानातून गावच्या ओढ्यावर वनराई बंधारा बांधला. या अनोख्या श्रमदानाच्या उपक्रमातून बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना कृतिशील आदरांजली वाहिली. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून राबविलेल्या ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्वच्छता आणि श्रमदानाच्या उपक्रमात बेलवडे बुद्रुक गावचे सरपंच डॉ. सुशांत मोहिते, उपसरपंच जयवंत कुंभार, ग्रामपंचायत सदस्य मारुती मोहिते, रुपेश मोहिते, जयवंत मोहिते, स्वाती मोहिते, संगीता भोसले, अलका मोहिते, माधुरी तडाके, जैबूनबी मुल्ला, पंचायत समिती कराडचे उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक निलेश पवार, समन्वयक करण जाधव, ग्रामपंचायत अधिकारी सदाशिव खांडके, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक मोहिते मॅडम आणि विद्यार्थी, ब्रह्मदास विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच बेलवडे बुद्रुक ग्रामसंघाच्या बचत गटातील सर्व महिला या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या गाव विहिरी लगतच्या ओढ्यामध्ये वनराई बंधारा बांधण्यात आला. पाणी आडवा पाणी जिरवा, या संकल्पनेनुसार बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे गाव विहिरीतील पाणी पातळी पुरेशी राहण्यास मदत होणार आहे. या उपक्रमांतर्गत गावातील बाजारपेठ, दत्त मंदिर, राम मंदिर, हनुमान मंदिर व चौकातील परिसर सर्वांकडून स्वयंस्फूर्तीतून स्वच्छ करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित मान्यवरांकडून प्रतिमेस वंदन करून अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीरित्या राबवण्याचा ग्रामस्थांनी व महिला बंधू-भगिनींनी संकल्प केलेला असून बक्षीसासाठी नाही तर ग्रामस्वच्छतेसाठी स्वयंस्फूर्तीने सर्वजण एकत्र येत आहेत तसेच शासनाच्या आवाहनानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या निर्णयाने घरपट्टी, वीज कर, आरोग्य इत्यादी कराची मागील थकबाकी मध्ये 50 टक्के सूट ही सन 2025- 26 चा संपूर्ण कर भरण्याच्या अटीवर देण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे बेलवडे बुद्रुक गावच्या ग्रामपंचायत वसुलीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होणार आहे.
याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी सदाशिव खांडके यांनी प्रास्ताविक सादर केले आणि सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बेलवडे बुद्रुक मधील ग्रामस्थांच्या ग्रामस्वच्छता आणि वनराई बंधारा निर्मितीचा व्हिडिओ खालील लिंकवर क्लिक करून नक्की पहा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
#ChangbhalaNews #BelwadeBudruk #GadgeBaba #Shramdaan
#Gramswachhata #VanraiBandhara #RuralDevelopment
#MukhyamantriSamruddhAbhiyan #Karad #Satara
#PaniAdvaPaniJirva #AdarshGaon #MaharashtraNews

0 टिप्पण्या