![]() |
कराड, दि. ७ नोव्हेंबर २०२५, चांगभलं वृत्तसेवा :
कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध कारवाई करून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण १ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या आदेशानुसार, कराड व मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय आणि अग्निशस्त्र धारकांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
दि. ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी कराडच्या पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांना खात्रीशीर माहिती मिळाली की,
१) अल्तमश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी (वय २५, रा. पालकरवाडा मंगळवार पेठ, कराड)
२) ओमकार दीपक जाधव (वय २२, रा. होली फॅमिली हायस्कूलजवळ, विद्यानगर सैदापूर, ता. कराड)
हे दोघे मौजे सैदापूर गावच्या हद्दीतील कॅनॉल परिसरात बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगून वावरत आहेत.
त्यामुळे पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी तात्काळ आपल्या कार्यालयातील पथकास सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून संशयित दोघांना ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान संशयितांच्याकडून खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला :
एक गावठी बनावटीचे पिस्तूल (किंमत ५० हजार रुपये.),
एक जिवंत काडतूस (किंमत ६०० रूपये),
एक स्मार्ट मोबाईल फोन (किंमत १५ हजार)
एक दुचाकी (किंमत ७५ हजार) असा एकूण १ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई राजश्री पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस अंमलदार प्रविण पवार, सागर बर्गे, प्रशांत चव्हाण आणि मयूर देशमुख यांनी केली.
या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. (श्रीमती) वैशाली कडुकर यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.
#KaradPolice #RajshreePatil #TusharDoshi #VaishaliKadukar #KaradCrimeNews #Saidapur #IllegalWeapon #ChangbhalaNews #KaradUpdates #MaharashtraPolice

0 टिप्पण्या