कराड, दि. ७ नोव्हेंबर | चांगभलं वृत्तसेवा :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देत सांगितले की, “काँग्रेस पक्ष मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक ताकदीने लढवणार असून प्रभागनिहाय चाचपणीला सुरुवात झाली आहे.”
अलीकडेच मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने परिस्थितीचा सामना करत आगामी निवडणूक अधिक संघटित पद्धतीने लढविण्याचा निर्धार केला आहे.
नामदेवराव पाटील म्हणाले की, “या निवडणुकीसाठी मित्र पक्षांसोबत चर्चा करून समन्वयाने अंतिम निर्णय घेतला जाईल.”
ते पुढे म्हणाले, “मलकापूर शहराचा नियोजनबद्ध विकास हा आदरणीय पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या दूरदृष्टीचे फलित आहे. शहरातील २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज सुविधा, सुसज्ज नगरपरिषद इमारत, अंतर्गत रस्ते आणि विविध विकास योजना या सर्व पृथ्वीराज बाबांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाल्या.”
“मलकापूर आणि पृथ्वीराज बाबा यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष ताकदीने लढवेल,” असेही पाटील यांनी सांगितले.
सध्या शहरात प्रभागनिहाय चाचपणी सुरू असून अनेक इच्छुकांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. यावेळी पाटील यांनी मलकापूर शहरातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाच्या पाठीशी उभे राहून निवडणूक विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
#MalakapurNews #KaradCongress #PrithvirajChavan #NamdevraoPatil #KaradPolitics #MalakapurMunicipalElection #ChangbhalaNews #MaharashtraPolitics #CongressStrong #KaradUpdates

0 टिप्पण्या