कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड येथील स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट आवारात आजपासून (शुक्रवार, दि. २६ डिसेंबर) २० वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव भव्य स्वरूपात सुरू होत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, पर्यटन व खनिकर्म मंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे यांनी दिली.
उद्घाटन सोहळ्यास मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार नितीन काका पाटील, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार सचिन पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर, तसेच सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, राज्याचे पणन संचालक संजय कदम यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, संस्थांचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता प्रगतीशील शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन, तर सायंकाळी ४ वाजता कृषिमंत्री व मान्यवरांच्या हस्ते मुख्य उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता ऊस पीक स्पर्धा, प्रदर्शन व नाविन्यपूर्ण कृषी अवजारे निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शनिवार दि. २७ रोजी केळी घड प्रदर्शन व स्पर्धा, तसेच सायंकाळी “उत्सव कृषी सौभाग्यवतींचा – खेळ पैठणीचा” हा सुप्रसिद्ध कलाकार वासू पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दि. २८ रोजी फुले, गाय–म्हैस–बैल प्रदर्शन,
सोमवार दि. २९ रोजी फळे व श्वान (डॉग) प्रदर्शन,
तर मंगळवार दि. ३० रोजी भाजीपाला पीक, शेळी–मेंढी व पक्षी प्रदर्शन होऊन सायंकाळी समारोप व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
४०० स्टॉल्स, पिलरलेस डोम व आधुनिक मांडणी...
यंदा सुमारे ४०० हून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात सहभागी होत असून पिलरलेस डोम पद्धतीचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. यामध्ये स्वतंत्र पशु–पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. डायनॅमिक इव्हेंटचे मॅनेजर धीरज तिवारी व सचिन पाटील यांनी स्टॉल उभारणी पूर्ण झाल्याची माहिती दिली.
कृषी विभागाच्या मार्गदर्शक मॉडेल्स ठरणार शेतकऱ्यांसाठी ‘गेम चेंजर’....
या कृषी प्रदर्शनात जिल्हा परिषद सातारा, कृषी विभाग व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी अनेक नाविन्यपूर्ण मॉडेल्स साकारण्यात आली आहेत.
यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ऑनलाईन लॅटरल, वेंचुरी, विहिरी, बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती पद्धती, मृदा आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक, कीड व रोग नियंत्रण, उत्पादनाला बाजारभाव, गोदाम व डीबीटी योजना यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
१० ड्रम थेअरी अंतर्गत कोंबडी अर्क, फळ अर्क, ई.एम. अर्क, सप्तधान्य स्लरी, डी-कंपोजर द्रावण, तसेच कंपोस्ट व गांडूळ खत निर्मितीचे मॉडेल शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे.
ऊस शेती, नैसर्गिक शेती व एआय तंत्रज्ञानाची प्रभावी मांडणी....
सुपर केन नर्सरीमार्फत ऊस बियाणे प्लॉट, बीज प्रक्रिया, ऊस लागवडीचे तंत्र, ७ ते २१ दिवसांपर्यंतच्या रोपांची स्थिती, खोडवा व पाचट व्यवस्थापन यांचे प्रत्यक्ष मॉडेल उभारण्यात आले आहेत.
ग्रीन हाऊस उत्पादने, बांधावर नारळ व फळझाड लागवड, सीआरए तंत्रज्ञान, जलतारा, मूलस्थानी जलसंधारण, तसेच एआय आधारित ‘महाविस्तार – शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र’ हे तंत्रज्ञान विशेष आकर्षण ठरणार आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, माती परीक्षण, शेततळे, क्षारपड जमीन सुधारणा, तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांची मॉडेलच्या माध्यमातून प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.
लोकनेते स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचे हे २० वे वर्ष असून, राज्यातील मोजक्या दर्जेदार कृषी प्रदर्शनांमध्ये याची गणना होते. या प्रदर्शनाचा लाभ शेतकरी, उद्योजक व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#Yashvantrao_Chavan_Krushi_Pradarshan_Karad #Karad #ChangbhalaNews #कृषीप्रदर्शनकराड #शेती #शेतकरी #कराडबाजारसमिती, #चांगभलंन्यूज




0 टिप्पण्या