कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती पत्रकार नितीन ढापरे यांचा पत्रकारांच्यावतीने झाला सन्मान.
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेमध्ये संधी देण्याचं काम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं. तीच परंपरा जोपासत स्वर्गीय विलासकाका पाटील - उंडाळकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेमध्ये सामावून घेतलं, त्यामुळेच नितीन ढापरे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बाजार समितीवर संधी मिळाली. ही परंपरा पुढे नेण्याचं काम आम्ही करत असून नितीन ढापरे यांच्या कुटुंबीयांनी आदरणीय काकांच्यावर कायम प्रेम केले.आगामी काळात नितीन ढापरे यांना राजकारण व समाजकारणात पाठबळ देऊ असा विश्वास रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष
अँड.उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सारंग श्रीनिवास पाटील,माजी मुख्याध्यापक पंडीत ढापरे,श्रीमती संघमित्रा ढापरे, सौ.सुजाता ढापरे यांची उपस्थिती होती.
कराड येथील वाय.झेड.इंडिया न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक नितीन भिमराव ढापरे यांची कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल कराड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्यावतीने त्यांचा खोडशी येथील हॉटेल शिवनेरी येथे सारंग पाटील यांच्या हस्ते व रयत साखर कारखान्याचे चेअरमन एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सपत्नीक सत्कार करण्यात आला.ग्रंथ,शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ,मानपत्र असे या सन्मानाचे स्वरूप होते.
ॲड.उदयसिंह पाटील उंडाळकर म्हणाले, आज संक्रमणाचा काळ आहे, मात्र या काळात जो विचारांच्या अधिष्ठानावर चालेल तोच पुढे जाईल. स्वर्गीय विलासकाका नेहमी सांगायचे 'निष्ठेने चालतो त्याला संधी मिळते. त्यानंतर मिळालेल्या संधीच सोन करण्याची जबाबदारी त्याची असते.' राजकारणामध्ये एक नेता ज्यावेळी एका कार्यकर्त्याला घडवितो, त्यावेळी तो ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेची १० वर्षे, त्या संघटनेच्या नेत्याची १० वर्षे, आणि त्या कार्यकर्त्याची स्वतःची १० वर्षे, अशा तीस वर्षाच्या संघर्षातून आणि कष्टातून एक कार्यकर्ता तयार होत असतो. त्यामुळे कोणतेही टीकाटिप्पणी करताना, आपण ती जरूर करावी, मात्र त्यापूर्वी त्याचे वास्तव तपासले पाहिजे.
सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा पायंडा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिला. तोच स्वर्गीय विलासकाकांनी जपला. त्याच मार्गाने आपण चालत आहोत, त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी न बघता फक्त सामाजिक बांधिलकी बघून नितीन सारख्या कार्यकर्त्याला मार्केट कमिटीवर संधी दिली. आणि स्वर्गीय काका नसताना झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपणाला यश मिळाले, आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळाला आहे, शेतीमालाला चांगला भाव मिळत आहे, असेही उंडाळकर यांनी सांगितले.
यावेळी सारंग पाटील पुढे म्हणाले, या कार्यक्रमात आम्हाला "यशवंत विचारांचे पाईक" असे तुम्ही संबोधले. हा आमचाही खरा सन्मान आहे. कारण आपण सर्वजण यशवंत विचारांच्या भूमीतले भूमिपुत्र आहोत. माझं ते खरं नव्हे तर खरं ते माझं म्हणून म्हणजे यशवंत विचार. हा विचार या मातीत रुजला आहे. तो राजकारणी म्हणून आम्ही आणि पत्रकार म्हणून तुम्ही सर्वांनी जोपासला पाहिजे. स्वर्गीय विलासकाकांनी हा यशवंत विचार कृतीतून जपला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आणि उदयदादांच्या अष्टपैलू नेतृत्वामुळे नितीन ढापरे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला सत्तेची संधी मिळाली.
सत्काराला उत्तर देताना नितीन ढापरे म्हणाले, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मार्केट कमिटीसाठी स्वर्गीय विलास काकांनी शब्द दिला, आणि उदयसिंह पाटील यांनी तो खरा करून दाखवला. अशी संधी देण्याचं काम फक्त यशवंत विचाराचीच मंडळी करू शकतात. त्यामुळेच आम्ही ज्या नेत्यासोबत काम करतो त्या नेत्याचा आम्हाला अभिमान वाटतो. उदय दादांच्या सातत्याने मार्गदर्शनामुळे शेतकरी आणि व्यापारी यांचा समतोल साधून मार्केट कमिटीच्या माध्यमातून तालुक्यात आम्ही काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्रमोद सुकरे, शशिकांत पाटील, संभाजी थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप चेणगे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रमोद तोडकर यांनी प्रास्ताविक केले,अभय देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.आभार जगन्नाथ कुंभार यांनी मानले.कार्यक्रमास कराड शहरासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराडबातमी
#नितीनढापरे
#कराडमार्केटकमिटी
#उपसभापतीनिवड
#विलासकाकापाटील
#उदयसिंहपाटीलउंडाळकर
#यशवंतविचार
#सर्वसामान्यकार्यकर्ता
#रयतसाखरकारखाना
#साताराराजकारण
#कराडपत्रकार
#चांगभलन्यूज
#ChangbhalaNews
#KaradNews
#SataraPolitics


0 टिप्पण्या