कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘रानगुंफी’ हे जंगलातील अनुभूतीवर आधारित छायाचित्रात्मक व्याख्यान मोठ्या उत्साहात पार पडला. या व्याख्यानात ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक, लेखक व छायाचित्रकार किरण पुरंदरे यांनी निसर्ग, प्राणी, पक्षी, जंगल आणि मानवी संवेदनशीलतेवर आधारित आपले अनुभव प्रभावीपणे मांडले. तसेच शब्द, छायाचित्रे आणि प्रत्यक्ष अनुभूती यांची सांगड घालत त्यांनी उपस्थितांना निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते जोडण्याची गरज पटवून दिली.
कृष्णा विश्व विद्यापीठातील नेचर पार्कमध्ये आयोजित व्याख्यानाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले, श्री. विनायक भोसले, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या व्याख्यानात श्री. पुरंदरे यांनी नागझिरा जंगलातील वास्तव्यातून मिळालेले अनुभव, वन्यजीवांचे स्वभाव, मानवी हस्तक्षेपाचे परिणाम आणि निसर्ग संवर्धनासाठी आवश्यक असलेली जबाबदार भूमिका यावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, निसर्ग हा उपभोगासाठी नसून सहअस्तित्वासाठी आहे. निसर्ग संवर्धन ही केवळ घोषणांची बाब नसून ती जीवनपद्धती बनली पाहिजे. निसर्ग संवर्धनावर चर्चा खूप होते; मात्र प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांची संख्या कमी आहे. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने निसर्गाचा नाश करणार नाही आणि इतरांनाही तो करू देणार नाही, असा ठाम संकल्प केला पाहिजे.
कार्यक्रमाच्या शेवटी निसर्गाशी सुसंवाद राखत जबाबदार जीवनशैली अंगीकारण्याची शपथ सर्वांनी घेतली. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर यांनी स्वागत व प्रास्तविक केले. याप्रसंगी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप, स्नेहलता पाटील, वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे, बाबासाहेब टाके, कराडच्या वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, कृष्णा कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, संशोधन संचालिका (नि. ब्रिगेडियर) डॉ. हिमाश्री, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर यांच्यासह निसर्गप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#ChangbhalaNews #KaradNews
#SataraNews #Rangufee
#NatureLecture #KiranPurandare
#KrishnaWorldUniversity #JaywantraoBhosale
#NatureConservation #WildlifeAwareness
#ForestExperience
#EnvironmentalResponsibility
#SahyadriTigerReserve #NaturePhotography
#SaveNature



0 टिप्पण्या