कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड-विजापूर राज्य मार्गावरील नवीन कृष्णा पुलावर आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुलावर संरक्षक जाळी बसविण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठानचे मनोज माळी यांनी सुरु केलेल्या उपोषणाला बुधवारी (ता. १४) रात्री आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी भेट दिली.
यावेळी आ.डॉ. भोसले यांनी कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसविण्यासाठी शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करत, शासकीय अधिकाऱ्यांना या कामाचे गांभीर्य समजावून सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाळी बसविण्याचे काम लवकरच सुरु करणार असल्याचे सांगितले.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आंदोलनकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ४० लाखाचे अंदाजपत्रक तयार केले असून, या खर्चाला शासकीय स्तरावर तातडीने मंजुरी मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. तसेच या कामासाठी येणाऱ्या सात दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, असेही आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे पुलावर होणाऱ्या अपघाती व दुर्दैवी घटनांना आळा बसण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#DrAtulBhosale #BjpKarad #KaradNews
#Karadkar #KrishnaBridgeKarad
#KaradCity #ChangbhalaNews

0 टिप्पण्या