![]() |
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील कष्टकरी आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम कराड तालुक्यात राबविण्यात आला. गोपाळ नगर येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने दररोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ३७ विधवा महिलांचा साडी वाटप करून सन्मान करण्यात आला.
गोपाळ नगर (कार्वे) परिसरातील भटक्या जमातीतील अनेक महिलांना अत्यंत कठीण परिस्थितीत कुटुंब सांभाळावे लागते. या महिलांकडे स्वतःची एक गुंठाही जमीन नसून कुटुंबातील कर्ते पुरुष व्यसनाधीनतेमुळे मृत्यूमुखी पडल्याने महिलांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली आहे. अशा परिस्थितीत दररोज मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलांना साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक महिलेने ताठ मानेने उभे राहून कष्टाची कामे करत आपल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संकटांना घाबरून बसण्यापेक्षा त्यांना सामोरे जात समाजाचे नाव उज्ज्वल करावे. महिलांनी आपल्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी.
तसेच त्यांनी महिलांना राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा आणि भिमाबाई आंबेडकर यांचा आदर्श घेऊन आपल्या मुलांना घडविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला प्रवीण काकडे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), दिलीप जाधव (माजी ग्रामपंचायत सदस्य), विष्णू हुलवान (सोसायटी सदस्य), मानसिंग पवार, रविंद्र जाधव, अर्जुन जाधव यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



0 टिप्पण्या