कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
एसटीच्या सेवाभावाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित करणारी घटना कराड परिसरात घडली आहे. कोल्हापूर–नाशिक मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला झालेल्या किरकोळ अपघातानंतर जखमी झालेल्या एका वृद्ध प्रवाशाला चालकाने स्वतः पुढाकार घेऊन तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण घालून दिले.
सोमवारी सकाळच्या सुमारास पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड फाट्याजवळ बसला धक्का बसला. या अपघातात पाटण तालुक्यातील शामराव मकामले हे जखमी झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक झहीर अब्बास यांनी विलंब न करता बस थेट कराड बसस्थानकात आणली आणि तेथून जखमी प्रवाशाला वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेनंतर चालकाने केवळ कर्तव्यापुरते काम न करता जखमी प्रवाशाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. ते रुग्णालयात पोहोचेपर्यंत स्वतः तेथे थांबून त्यांनी वृद्धाची काळजी घेतली. दिवसभर अन्न-पाण्याची पर्वा न करता त्यांनी दाखवलेला सेवाभाव सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
वेळीच उपचार मिळाल्यामुळे संभाव्य धोका टळला असून, या प्रसंगामुळे एसटी सेवेमधील माणुसकी आणि जबाबदारीची भावना पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.

0 टिप्पण्या