कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातून वन्यजीवप्रेमींसाठी आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अलीकडेच लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दुर्मिळ समजला जाणारा ब्लॅक पँथर (काळा बिबट्या) कैद झाला असून, या घटनेमुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनाला नवी पुष्टी मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम घाट भागातील काळे बिबटे (मेलॅनिस्टिक बिबटे) अत्यंत दुर्मिळ असून, ते सहसा मानवाच्या नजरेस पडत नाहीत. विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांमधील घनदाट जंगलांमध्ये त्यांच्या हालचालींच्या नोंदी अलीकडच्या काळात वाढताना दिसत आहेत. तिलारी, राधानगरी आणि रत्नागिरी परिसरात यापूर्वीही अशा दुर्मिळ दर्शनांच्या नोंदी आढळल्या आहेत.
वन विभागाच्या माहितीनुसार, ब्लॅक पँथर ही स्वतंत्र प्रजाती नसून, यामध्ये बिबट्यामध्ये आढळणाऱ्या मेलॅनिझम (जनुकीय उत्परिवर्तन) मुळे त्यांचा रंग गडद काळा होतो. या गडद कातडीमुळे त्यांना घनदाट, ओलसर आणि सावलीच्या जंगलांमध्ये उत्कृष्ट छद्मावरण (कॅमोफ्लाज) मिळते, ज्यामुळे ते सहज लक्षात येत नाहीत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि पश्चिम घाट हे जगातील जैवविविधतेने समृद्ध असे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. येथे अनेक दुर्मिळ व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती, प्राणी, पक्षी आणि अन्य प्रजातींचे वास्तव्य आहे. त्यामुळे या भागातील अशा नोंदी केवळ उत्सुकता वाढवणाऱ्या नसून, संवर्धनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, अशा कॅमेरा ट्रॅपमधील नोंदींमुळे जंगलातील प्राण्यांच्या हालचाली, संख्या आणि अधिवास यांचा अभ्यास अधिक प्रभावीपणे करता येतो. सह्याद्रीतील या दुर्मिळ पाहुण्याने पुन्हा एकदा या प्रदेशाच्या नैसर्गिक संपन्नतेची जाणीव करून दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#ब्लॅकपॅंथर #काळाबिबट्या #blackleopard #Changbhala
#ChangbhalaNews #wildlifeNews #Sahyadri
#SahyadriTigerReserve #WesternGhat
#चांगभलंन्यूज #changbhalaNewspaper

0 टिप्पण्या