आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा पुढाकार; वर्षभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन, कराडचा राजकीय दुरावाही चर्चेत
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी राज्य सरकारकडून पाच कोटींचा निधी संरक्षण भिंत व पेव्हर ब्लॉकसाठी मंजूर करून घेतला, आता त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होत आहे. वर्षभरात ते काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
शहरातील श्री दैत्यनिवारणी मंदिर परिसरात ५ कोटींच्या निधीतून कृष्णा नदीच्या अलीकडील बाजूस संरक्षक भिंत व मंदिर परिसरातील सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आमदार भोसले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. माजी आमदार आनंदराव पाटील, कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, माजी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, नगरसेवक शिवाजी पवार, आशुतोष डुबल, अतुल शिंदे, सुहास जगताप, अजय पावसकर, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, भाजप महिला शहराध्यक्षा सुषमाताई लोखंडे आदींसह शहर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
आमदार भोसले म्हणाले, संरक्षण भिंत २२० मीटर लांब असून, ही साडेसात फूट उंच गॅबियन पद्धतीची आहे. त्याचे काम पूर्ण होणार आहे. मंदिर परिसरात ११०० चौरस फूट पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात येणार आहेत, त्यामध्ये दगडी पिचिंग असणार आहे. हे काम वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
ते म्हणाले, विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी या कामाचा पाठपुरावा मी केला होता. त्यानुसार पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून संरक्षित भिंत व पेव्हींग ब्लॉक बसवण्यात येणार आहेत, त्याबाबत अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. याबाबत असलेले काही अडथळे सोडवून सदरचे काम मंजूर करून आणले. ते काम माझ्या माध्यमातून होत आहे, याचे मला समाधान आहे. कराडकरांचे श्रद्धास्थान असलेल्या दैत्यनिवारणी मंदिराचे काम बारा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
यावेळी जयवंत पाटील , विजय वाटेगावकर, आशुतोष डुबल यांनीही मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केले.
मंदिर परिसर विकासाला गती; सुरक्षितता व सुशोभीकरणावर भर...
शासनाच्या नियोजन विभागाच्या मान्यतेनंतर मंदिर परिसर विकास प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून सुशोभीकरण, सुरक्षितता आणि भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मान्यतेनंतर कामांना गती मिळाली असून सुमारे २२० मीटर गॅबियन वॉल, २५ मीटर आरसीसी संरक्षक भिंत, ११०० चौ.मी. पेव्हिंग ब्लॉक, २२० मीटर दगडी पिचिंग आणि १५ मीटर जी.आय. पाईप रेलिंगची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या विकासकामांमुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित, स्वच्छ व आकर्षक होणार असून स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
कराडमधील 'पॉलिटिकल' दुरावा चर्चेत...
कराडच्या सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद नगरपालिकेच्या निमित्ताने पुन्हा-पुन्हा चर्चेत येत आहेत. शिवसेना उपनेते तथा पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीला भाजप आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी 'दांडी' मारली होती. तर आमदारांच्या उपस्थितीतील आजच्या कार्यक्रमाकडे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी पाठ फिरवली. नगरपालिका निवडणुकीपासून शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील हा सिलसिला आता जिल्हा परिषद निवडणुकीनंतर तीव्र होत आहे. यावर आमदार डॉ. भोसले पत्रकारांशी बोलताना थेट भाष्य केले. 'नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना शासकीय निमंत्रण देण्यात आले होते, मात्र ते आले नाहीत, तरीही पुढच्या कार्यक्रमांना त्यांना सन्मानाने बरोबर घेऊ' असे त्यांनी स्पष्ट केले.



0 टिप्पण्या