नगरपालिकेकडून टीडीआर प्रणालीची अंमलबजावणी ; ‘अभियान ते अभिमान’ या ९० दिवसांच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
मलकापूर नगरपालिकेने विकासाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल सुरू केली असून, नियोजनबद्ध कामांमुळे शहराला ‘अल्ट्रा मॉडेल’ बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. टीडीआर प्रमाणपत्र देणारी ही महाराष्ट्रातील ‘क’ वर्ग दर्जाची पहिली नगरपालिका ठरली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील २५ वर्षांचा आराखडा डोळ्यासमोर ठेवत विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
मलकापूर नगरपालिकेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘अभियान ते अभिमान’ या संकल्पनेतून ९० दिवसांच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष तेजस सोनावले, नियोजन व विकास समिती सभापती सूरज शेवाळे, आरोग्य समिती सभापती धनंजय येडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली पाटील, उपसभापती गीता साठे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती हणमंतराव जाधव, नगरसेवक दादासो शिंगण, नितीन काशिद आदी नगरसेवक, मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार भोसले यांनी सांगितले की, शहर विकास प्रक्रियेत TDR (Transferable Development Rights) प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावते. शहराच्या विकासाठी टीडीआर प्रमाणपत्र प्रदान करणे खूप महत्त्वाचे आहे. शहर विकासात एक गुंठा जमीन गेल्यास त्याला या प्रमाणपत्रानुसार दोन गुंठे जमीन मिळणार आहे. मलकापूरमध्ये या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी होत असून, राज्यात वेगळा आदर्श निर्माण केला गेला आहे.
नगराध्यक्ष तेजस सोनावले यांनी सांगितले की, ५ एप्रिल ते ४ जुलै या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ९० दिवसांच्या उपक्रमात पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, डिजिटल प्रशासन, कचरा व्यवस्थापन आणि नागरिक सहभागावर विशेष भर दिला जाणार आहे.
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दूरदृष्टीतून मलकापूर शहराचा भविष्यातील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार केला पाहिजे, असे सांगितले होते. आता आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २०५२ सालाच्या दृष्टीने हा आराखडा तयार करण्यात येणार आहे. सध्या ९० दिवसांच्या अभियानात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. वाढत्या लोकसंख्येला पूरक सुविधा, २४ तास पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि सौर ऊर्जेचा वापर यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
यावेळी विकासासाठी जमीन दिलेल्या नागरिकांना 'टीडीआर' प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच पालिका कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न सोडवत त्यांना धनादेश देण्यात आले.
दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी मलकापूर येथील १.५० कोटी निधी मंजूर असलेल्या बैल बाजार रोड ते वनराई गार्डन रस्ते काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन, ५० लक्ष निधीतून करण्यात आलेल्या आगाशिवनगर कोप्लँड कंपनी ते पोळ पाणंद रस्त्याचे उदघाटन, आणि १९ लाख रुपयांचा निधी खर्चून करण्यात आलेल्या आगाशिवनगर रस्त्याचे उदघाटन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
महत्वाच्या भागांना नवा पर्याय रस्ता....
मलकापूर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा नवा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर दोन भागांत विभागणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन प्रमुख वर्दळीच्या भागांना पर्यायी कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. यामुळे नागरिकांची वाहतूक सुलभ होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे.
आमदारांच्या पगारातून कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास दौरा...
नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रगत शहरांचा अभ्यास करून स्थानिक विकासाला गती द्यावी, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विशेष पुढाकार घेत असल्याची घोषणा केली. अभ्यास दौऱ्यासाठी आपला आमदार म्हणून मिळणारा एक महिन्याचा पगार नगरपालिकेला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.



0 टिप्पण्या