चांदोली | चांगभलं वृत्तसेवा
पर्यटकांचे माहेरघर आणि निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण असलेल्या येथे प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आल्याने आता येथे येणाऱ्या पर्यटकांच्या खर्चात वाढ होणार आहे. वन विभागाने पर्यटनासाठी नवीन दरपत्रक लागू करत विविध शुल्कांमध्ये सुधारणा केली आहे.
नवीन दरानुसार शासकीय वाहन (गाईड फी सहित) प्रौढांसाठी २५० रुपये तर १२ वर्षांखालील मुलांसाठी २०० रुपये आकारले जाणार आहेत. खाजगी वाहनाने येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रौढांसाठी २५० रुपये, मुलांसाठी १२५ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तसेच हलक्या वाहनांसाठी ५०० रुपये आणि जड वाहनांसाठी ७५० रुपये शुल्क आकारले जाईल. स्वतंत्र गाईड फी ३०० रुपये ठेवण्यात आली आहे.
शैक्षणिक सहलींसाठी काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. शाहूवाडी व शिराळा तालुक्यांतील पर्यटकांसाठी प्रौढांना १५० रुपये आणि मुलांना १०० रुपये, तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पर्यटकांसाठी प्रौढांना २०० रुपये आणि मुलांना १५० रुपये शुल्क आकारले जाईल.
कॅमेरा शुल्कातही बदल करण्यात आला असून, व्हिडिओ कॅमेरासाठी १०० रुपये तर साध्या कॅमेरासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल. कंटेनर हाऊससाठी १५०० रुपये (सकाळी ११ ते दुसऱ्या दिवशी १० पर्यंत) शुल्क असून अतिरिक्त बेडसाठी ५०० रुपये मोजावे लागतील.
दरवाढीसोबतच वन विभागाने काही कडक नियमही लागू केले आहेत. पर्यटनासाठी तिकीट खिडकी सकाळी ६.०० वाजता उघडून दुपारी ३.०० वाजेपर्यंतच तिकिटे दिली जाणार आहेत. शासकीय बससाठी किमान १० पर्यटकांची अट घालण्यात आली असून, ती संख्या पूर्ण न झाल्यास बस सोडली जाणार नाही. शासकीय बस उपलब्ध नसल्यासच खाजगी वाहनांना परवानगी दिली जाईल.
दरम्यान, प्रत्येक गुरुवारी पर्यटन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वनक्षेत्रात कोणतेही नियमभंग किंवा शासकीय कामात अडथळा आणल्यास आणि अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
वन विभागाने पर्यटकांना नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, वाढीव शुल्कामुळे पर्यटकांच्या संख्येवर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#चांदोलीराष्ट्रीयउद्यान #सह्याद्रीव्याघ्रप्रकल्प #चांदोलीपर्यटन
#सह्याद्रीपर्यटन #वनविभाग #उन्हाळीसुट्टी
#चांगभलंन्यूज #ChangbhalaNews

0 टिप्पण्या