कृष्णा आर्थिक परिवारातील सेवकांना पगारवाढीची घोषणा
कृष्णा शिक्षणसंस्थेचे विद्यापीठात रूपांतर करण्याचे स्वप्न स्व. जयवंतराव भोसले यांनी पाहिले आणि ते यशस्वीरीत्या साकार झाले. त्याच धर्तीवर आता कृष्णा बँकेला ‘शेड्युल बँक’चा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी केले.
कृष्णा आर्थिक परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा डॉ. सुरेशबाबा भोसले, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि संचालक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सुरेशबाबा भोसले बोलत होते. कार्यक्रमास कृष्णा बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेताना डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी सांगितले की, १९७१ पासून सुरू झालेल्या या वाटचालीने आज मजबूत पायाभरणी केली आहे. १९८४ साली अवघ्या १५ ते २० कोटी ठेवी असलेली संस्था २०२६ मध्ये ३१०० कोटींच्या टप्प्यावर पोहोचली आहे. हा प्रवास ग्राहकांचा वाढता विश्वास आणि संस्थेची विश्वासार्हता दर्शवणारा आहे. यशामागे कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता, डिजिटल सेवांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षणावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहककेंद्री सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आधुनिक प्रणाली स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘शेड्युल बँक’ होण्यासाठी आवश्यक निकषांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, १००० कोटींच्या इतर ठेवी, शून्य एनपीए आणि विविध क्षेत्रांना कर्जवाटप वाढवणे ही उद्दिष्टे गाठावी लागतील. सध्या ३० शाखांमधून सेवा दिली जात असून, भविष्यात विस्तारासाठी ठोस धोरण आखले जात आहे.
ऊर्जेच्या वाढत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जा हा प्रभावी पर्याय ठरत असल्याचे सांगत आमदार अतुल भोसले यांच्या पुढाकारातून ‘सूर्यघर योजना’ राबवली जात आहे. जागतिक परिस्थितीमुळे ऊर्जा क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर ही योजना नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी नमूद केले.
कृष्णा बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, कोविडपूर्वी ८३५ कोटी असलेला व्यवसाय सहा वर्षांत ३१०० कोटींवर पोहोचला आहे. सहकारी बँकांवरील विश्वास कमी होत असताना पारदर्शकता आणि शिस्त यावर भर देत ‘ए प्लस’ दर्जा आणि २०० टक्के कव्हरेज रेशो मिळवण्यात यश आले आहे. पुढील वर्षासाठी ४२५० कोटींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असल्याचे त्यांनी जाहीर केले.
कर्मचाऱ्यांसाठी मेरिट बेस प्रणाली लागू करण्यात येणार असून, बँकिंग क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच कामगार दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) आणि सुरेशबाबा भोसले यांच्या विचारांवर आधारित व्यवस्थापनामुळे कृष्णा आर्थिक परिवार सक्षमपणे उभा आहे. सर्व संस्थांचा एनपीए शून्यावर ठेवण्यात यश आले असून, ही परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार शिवाजीराव थोरात यांनी मानले.
वीजबिलमुक्तीचा संकल्प...
पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत कराड दक्षिण मतदारसंघात १० हजार घरांवर सौरयंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट आहे. ३ किलोवॅटपर्यंतची प्रणाली सुमारे १.२० लाख रुपयांत उपलब्ध होणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर दरमहा सुमारे ३ कोटी आणि वर्षाला ३६ कोटी रुपयांची वीजबिल बचत होणार असून, मतदारसंघ वीजबिलमुक्त करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#Krishna #KaradNews #KrishnaBankKarad
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

0 टिप्पण्या