चांगभलं वृत्तसेवा | मुंबई
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा–खंडाळा घाट परिसरात उभारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी “मिसिंग लिंक मार्ग” प्रकल्पाला स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संतोष पटकारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून, सदर “मिसिंग लिंक मार्ग” हा महाराष्ट्राच्या विकासातील ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पाचे उद्घाटन १ मे २०२६ रोजी होणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समजल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
लोकपरंपरा आणि जनश्रुतीनुसार, सह्याद्रीतील कठीण बोरीघाट परिसरात मार्गदर्शन करून ब्रिटिशांना मदत करताना त्याबदल्यात स्वातंत्र्याची मागणी करणारे व त्यासाठी हौतात्म्य पत्करणारे स्वाभिमानी क्रांतिकारक म्हणून स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत या ऐतिहासिक मार्गाला त्यांचे नाव देणे हे सामाजिक न्याय व ऐतिहासिक सन्मानाचे प्रतीक ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध समाजघटकांचे योगदान महत्त्वाचे असून, दुर्लक्षित पण प्रेरणादायी क्रांतीवीरांच्या नावाने प्रकल्पांचे नामकरण झाल्यास नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळेल, असेही पटकारे यांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा झाल्यास राज्यासाठी अभिमानाची बाब ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, १ मे २०२६ पूर्वी “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करण्याची मागणी करण्यात आली असून, या निर्णयामुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#धनगरमहासंघ #मुंबईपुणेमिसिंगलिंकमार्ग #संतोषपटकारे
#स्वातंत्र्यवीरशिंगोबाधनगर #चांगभलंन्यूज #चांगभलं
#ChangbhalaNews #महाराष्ट्र

0 टिप्पण्या