आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची शक्यता
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड उत्तर मतदारसंघातील कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील गावठाण हद्दीत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘ब सत्ता’ नोंदींचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या संदर्भात प्रशासनाने हालचाली वेगवान केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवून याबाबतची प्रक्रिया गतिमान केली आहे.
सविस्तर माहिती अशी, गावातील नगर भूमापन योजनेदरम्यान १९८२ साली झालेल्या त्रुटींमुळे अनेक पारंपरिक मिळकतींवर ‘ब सत्ता’ अशी नोंद करण्यात आली होती. प्रत्यक्षात अनेक कुटुंबांचा या जमिनींवर पिढ्यानपिढ्या ताबा असतानाही, या नोंदीमुळे मालकी हक्कांबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. परिणामी, जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार, बँक कर्ज प्रक्रिया तसेच बांधकाम परवानग्या मिळवताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात आमदार घोरपडे यांनी, शासन स्तरावर पाठपुरावा करत महसूल विभागाचे लक्ष वेधले.
महसूल विभागाने प्रकरणाची दखल घेतली असून, संबंधित नोंदींचे पुनरावलोकन करून योग्य निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेषतः १५ मार्च २०२१ च्या शासन परिपत्रकाच्या आधारे, नगर भूमापनातील त्रुटी दुरुस्त करून नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे.
यावर सकारात्मक भूमिका घेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत., त्यानंतर पुढील कार्यवाहीला गती मिळणार आहे. यामुळे कोपर्डे हवेलीतील शेकडो मिळकतधारकांच्या नावासमोरील ‘ब सत्ता’ नोंद रद्द होऊन त्यांना पूर्ण मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घडामोडींचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, प्रक्रिया लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लवकरच हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल!
"कोपर्डे हवेलीतील ग्रामस्थांना तांत्रिक चुकीमुळे अनेक वर्षे त्रास सहन करावा लागला. या अन्यायाला पूर्णविराम देण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. लवकरच हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल."
---- आमदार मनोज घोरपडे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#ManojGhorpade #KaradNorth #KaradNews

0 टिप्पण्या