कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांना तात्पुरता विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत शहरातील अनेक विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळून कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. मात्र, गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे ही कामे पुढे ढकलण्यात आली आहेत.
शासनाच्या दि.२७ मार्च २०२६ च्या आदेशानुसार, सध्या जागतिक भू-राजकीय घडामोडींमुळे ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे देशातील पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा प्रभावित झाला असून एलपीजी उपलब्धतेवरही मर्यादा निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) जोडण्यांचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
याच अनुषंगाने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), सातारा यांनी कराड नगरपरिषद हद्दीत गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी मागितली आहे. या कामासाठी शहरातील विविध रस्त्यांची खुदाई केली जाणार आहे.
या परिस्थितीत, रस्ते खुदाईनंतर पुन्हा विकासकामे करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आधी गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतरच जिल्हा वार्षिक योजनेतील विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर यांनी दिली.
दरम्यान, या निर्णयामुळे नागरिकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, भविष्यातील सोयीसाठी एकदाच समन्वयाने कामे पूर्ण करण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#KaradNews #KaradCityNews #ChangbhalaNews
#कराडनगरपालिका #चांगभलंन्यूज

0 टिप्पण्या