आज नगरप्रदक्षिणेची उत्सुकता
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहराची ग्रामदेवता श्री कृष्णामाईच्या चैत्री यात्रेला यंदा उत्साहाची उंची गाठल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोमवारी पार पडलेल्या या यात्रेमध्ये मंदिर परिसरासह संपूर्ण कृष्णाघाट भाग विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. सुवर्णालंकारांनी सजलेल्या आणि भरजरी साडी परिधान केलेल्या कृष्णामाईच्या मोहक रुपाचे दर्शन घेत भक्तांनी भावपूर्ण नतमस्तक होत श्रद्धा व्यक्त केली.
परंपरेनुसार यात्रेत विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कराड शहरासह परिसरातील गावांमधून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने संपूर्ण घाट परिसर भक्तीमय वातावरणाने भरून गेला होता. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
यात्रेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून कृष्णामाईला पारंपरिक पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच सुहासिनींनी खणा-नारळाने देवीची ओटी भरत पूजा केली. यात्रेनिमित्त उभारण्यात आलेल्या प्रसाद, मिठाई, खेळणी विक्रीच्या स्टॉल्स तसेच विविध खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरही मोठी गर्दी झाली होती.
हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सवाद्य ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक काढत यात्रेला प्रारंभ झाला होता. त्यानंतर मंडपात ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील दिवशी नवचंडी याग पार पडला. याशिवाय राजेंद्र कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘गीतरामायण’ कार्यक्रमाने भक्तांना मंत्रमुग्ध केले. भजन, हळदी-कुंकू, पूजाअर्चा, ‘मन करा रे प्रसन्न’ आणि जुन्या हिंदी चित्रपटांच्या गाण्यांचा कार्यक्रम यांमुळे यात्रेला अधिक रंगत आली. दररोज महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले.
आज होणार नगरप्रदक्षिणा....
यात्रेच्या मुख्य दिवसानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे मंगळवारी (दि. ७ रोजी) सकाळी ढोल-ताशांच्या गजरात कृष्णामाईची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी निघणार आहे. या मिरवणुकीला विशेष धार्मिक महत्त्व असून, मार्गावर मानकरी, नागरिक आणि व्यापारी पालखीचे आतषबाजीसह स्वागत करत देवीचे दर्शन घेणार आहेत. नगरप्रदक्षिणेनंतर पालखी मंडपात परतल्यानंतर सायंकाळी लळीत कीर्तन, वसंतपूजा आणि रात्री येसूबाईच्या यात्रेसह या महोत्सवाची पारंपरिक सांगता होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #KaradNews #KaradCity #ChangbhalaNews



0 टिप्पण्या