हैबत आडके, कराड| चांगभलं प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील साखरी लघुपाटबंधारे प्रकल्पातील प्रलंबित कामांसाठी तब्बल ४७.८८ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द भाजप नेते भरत पाटील (नाना) यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण केला.
साखरी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सूर्यकांत उर्फ राजू काळे यांच्या नेतृत्वाखाली गेली १४ वर्षे या प्रकल्पासाठी सातत्याने लढा सुरू होता. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सातारा कार्यालयामार्फत नवीन सुधारित प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासन स्तरावर भरत पाटील यांनी या कामासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यानंतर नुकतीच या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली.
या निधीतून काळगाव जॅकवेल दुरुस्ती, प्रस्तावित कामे तसेच धामणी, कुठरे, सुपुगडेवाडी आणि वाझोली गावांसाठी सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे ३१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
२०११ पासून प्रलंबित असलेल्या अनेक तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प रखडला होता. धरणाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक असलेला रिंग रोड अपूर्ण राहणे, सांडव्याचे काँक्रीटीकरण न होणे, जॅकवेल सिस्टिम नादुरुस्त असणे तसेच प्रस्तावित चार केटी वेअरचे बांधकाम अपूर्ण राहणे असे प्रश्न कायम होते. या सर्व प्रश्नांवर संघर्ष समितीने सातत्याने आवाज उठवला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात आले.
या मंजुरीनंतर काळगाव जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी भाजप नेते भरत पाटील (नाना) आणि संघर्ष समितीचे आभार मानले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#भरतपाटील #भाजप #ढेबेवाडी #सणबूर #पाटण #सातारा
#साखरीधरण #चांगभलं #चांगभलंन्यूज #साप्ताहिकचांगभलं
#ChangbhalaNews

0 टिप्पण्या