दोन दिवसातच 'इतक्या' उमेदवारी अर्जांची विक्री
चांगभलं प्रतिनिधी | कराड
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेत इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे. अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी आणखी दोन जणांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत गट क्रमांक ६ रेठरे बुद्रुक-शेणोली उत्पादक सभासद मतदारसंघातून संतोष बबन जाधव आणि बापूसाहेब व्यंकटराव साळुंखे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या चार झाली आहे.
याआधी अर्ज दाखल प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी गट क्रमांक २ काले-कार्वे मतदारसंघातून दयाराम भीमराव पाटील यांनी, तर गट क्रमांक ४ रेठरे हरणाक्ष-बोरगाव मतदारसंघातून पोपट रंगराव कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.
दरम्यान, कारखाना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. मंगळवारी एकाच दिवशी ६० नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. दोन दिवसांत एकूण ८२ अर्ज विकले गेल्याने आगामी दिवसांत उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २२ मे असून त्यानंतर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ९ जूनपर्यंत राहणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर २१ जून रोजी मतदान होणार असून २३ जूनला मतमोजणीद्वारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णा_साखर_कारखाना_निवडणूक #कृष्णाकारखाना
#सहकारपॅनेल #संस्थापकपॅनेल #चांगभलंन्यूज #चांगभलं
#साप्ताहिकचांगभलं #निवडणूक #ChangbhalaNews

0 टिप्पण्या